लाल मिरचीला महागाईची फोडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 04:36 AM2018-04-19T04:36:53+5:302018-04-19T04:36:53+5:30

परराज्यांतून आवक : गतवर्षीच्या तुलनेत भाववाढ होऊनही मसाला तयार करण्यासाठी मागणी

Inflation of inflation by red pepper | लाल मिरचीला महागाईची फोडणी

लाल मिरचीला महागाईची फोडणी

googlenewsNext

पिंपरी : वर्षभरासाठी लागणारा मसाला करण्याची लगबग आणि लग्नसराई यामुळे लालबहादूर शास्त्री भाजी मंडईत ग्राहकांची मिरचीला मागणी वाढली आहे. विविध प्रकारच्या मिरच्या आणि मसाल्यासाठी लागणारे पदार्थांचे भाव वधारले आहेत.
बाजारात साधारण १२० रुपयांपासून २०० रुपये किलोपर्यंत मिरची उपलब्ध आहे. लवंगी, तेजा, गुंटुर, शंकेश्वरी, चपाटा, रसगुल्ला, बॅडगी, काश्मिरी, रेशमपट्टा या प्रकारच्या मिरच्या बाजारात उपलब्ध आहेत. कर्नाटक, आंध्रप्रदेश या ठिकाणहून मिरची बाजारात दाखल होते. गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी भाव थोडे वाढल्याची चर्चा ग्राहकांमध्ये आहे.
गेल्या वर्षी साधारणपणे १०० रुपये किलो असा भाव मिरचीला होता त्यात या वर्षी काही प्रमाणात वाढ झाली आहे. गृहिणींची सध्या वर्षभरासाठी लागणारा मसाला तयार करण्याची लगबग सुरू आहे. त्यामुळे मसाल्यासाठी लागणारी मिरची व मसाल्याचे पदार्थ घेण्यासाठी गृहिणी मिरची बाजाराकडे वळू लागल्या आहेत. मसाल्यासाठी लागणारे इंदोरी, गावरान, ग्रीन धने बाजारात उपलब्ध आहेत. गृहिणींकडून धन्यांना सर्वाधिक मागणी आहे.
हॉटेल व्यावसायिकांकडून देखील याच दिवसांत मिरची खरेदी करून ठेवली जाते. पदार्थ झणझणीत करण्यासाठी व त्याला तर्री येण्यासाठी शंकेश्वरी व रेशमपट्टा मिरची हॉटेल व्यावसायिक खरेदी करीत असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. त्याचप्रमाणे लग्नसराई सुरू असल्यामुळेही लग्नातील चमचमीत जेवण तयार करण्यासाठी मिरची व मसाल्याची मागणी वाढली आहे.

गुंटूर, लवंगी : तिखट खाणाऱ्यांना चव

पिंपरीच्या लालबहादूर शास्त्री मंडईत शंकेश्वरी (१४० रु. किलो), रेशमपट्टा (२०० रु. किलो) व ब्याडगी (१८० रु. किलो) या मिरचीला सर्वाधिक मागणी आहे. याशिवाय लवंगी (१२० रु. किलो), तेजी (१४० रु. किलो), चपाटा (१६० रु. किलो), रसगुल्ला (२०० रु. किलो), काश्मिरी (२०० रु. किलो) या मिरच्याही उपलब्ध आहेत. कमी तिखट खाणाºया कुटुंबाची ब्याडगी मिरचीला पसंती आहे. ही मिरची चवदार व गडद रंगाची असते. तर झणझणीत व जास्त तिखट खाणाºया कुटुंबाची गुंटूर, लवंगी व तेजा या मिरचीला अधिक मागणी आहे. लवंगी, तेजा, गुंटुर, शंकेश्वरी, चपाटा, रसगुल्ला, बॅडगी, काश्मिरी, रेशमपट्टा या प्रकारच्या मिरच्या बाजारात उपलब्ध आहेत.

दर वर्षीच एप्रिल आणि मे महिन्यामध्ये मिरचीची मागणी वाढते. मिरचीप्रमाणेच मसाल्याचे पदार्थही आवर्जून खरेदी केले जातात. मसाले तयार करणाºया बचत गटांकडून या दिवसात मिरचीला जास्त मागणी असते.’’
- नितीन ब्राह्मणकर, विक्रेते
आम्ही दर वर्षी घरगुती मसाला तयार करतो. बाजारातील रेडिमेड मसाल्यापेक्षा घरी तयार केलेला मसाला परवडतो. त्याचप्रमाणे आपल्याला हवा तसा कमी-जास्त तिखट करता येतो. त्यामुळे आम्ही मिरची खरेदी करूनच मसाला तयार करतो.
- अश्विनी कुंभार, गृहिणी
हॉटेलमधील चमचमीत पदार्थ तयार करण्यासाठी उत्तम दर्जाची मिरची आवश्यक असते. रेडिमेड मसाल्यात वापरलेल्या मिरचीची गुणवत्ता आपण तपासू शकत नाही. त्यामुळे पदार्थांना चवदेखील येत नाही. उत्तम दर्जाची मिरची वापरल्यामुळे पदार्थांची गुणवत्ता टिकून ठेवता येते.’’
- मनोज चव्हाण, हॉटेल व्यावसायिक

Web Title: Inflation of inflation by red pepper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.