टार्गेट अन् डेडलाइनच्या जाळ्यात गुरफटताहेत आयटीयन्स, वाढत्या आत्महत्या ही चिंतेची बाब  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 04:00 AM2017-11-27T04:00:40+5:302017-11-27T04:00:56+5:30

गेल्या १० वर्षांत आयटीचे माहेरघर अशी पुण्याची नवीन ओळख बनली. देशातील सर्वाधिक आयटी इंडस्ट्री पुण्यात विस्तारली. उच्च लाईफ स्टाईल, गलेलठ्ठ पॅकेज यामुळे अनेक तरुण आयटीकडे आकर्षित होत आहेत.

 ITIs struggling with targets and deadlines, increasing suicide is a matter of concern | टार्गेट अन् डेडलाइनच्या जाळ्यात गुरफटताहेत आयटीयन्स, वाढत्या आत्महत्या ही चिंतेची बाब  

टार्गेट अन् डेडलाइनच्या जाळ्यात गुरफटताहेत आयटीयन्स, वाढत्या आत्महत्या ही चिंतेची बाब  

Next

वाकड : गेल्या १० वर्षांत आयटीचे माहेरघर अशी पुण्याची नवीन ओळख बनली. देशातील सर्वाधिक आयटी इंडस्ट्री पुण्यात विस्तारली. उच्च लाईफ स्टाईल, गलेलठ्ठ पॅकेज यामुळे अनेक तरुण आयटीकडे आकर्षित होत आहेत. अतिशय झगमगाटातील या दुनियेत काम करणारे आयटी अभियंते मात्र गेल्या दोन वर्षांपासून प्रचंड तणावाखाली असल्याचे वास्तव आहे. वाढत्या तणावातून अलीकडच्या काळात अनेक आयटीयन्सनी आत्महत्या केल्या. या आत्महत्या ही चिंतेची बाब बनली आहे.
आयटीत रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध झाल्या; मात्र अलीकडच्या १० वर्षांत परिस्थितीत खूप बदल झाला आहे. बाहेरून पंचतारांकित, ग्लॅमरस वाटणारी आयटीची ही दुनिया अभियंत्यांसाठी सध्या तरी असुरक्षित असल्याचे वास्तव आहे. टार्गेट, शेअर रिसोर्स, डेडलाइनच्या ओझ्याखाली युवक चाचपडत असल्याने या जाचाला आणि तणावाला वैतागून अनेक अभियंते नैराश्याच्या प्रभावाखाली जात आहेत.
बदलती जीवनशैली - बहुतेक आयटीयन्सचे भावविश्व संगणकाभोवतीच फिरते. सर्वाधिक वेळ लॅपटॉप, संगणक, मोबाइल यात घालवतात. त्यामुळेच हळूहळू त्यांची जीवनशैली बदलू लागते. रात्री उशिरा येणे, वाट्टेल ते व्यसन करणे, भौतिक सुखाची आस बाळगणे, खर्च करणे, वातावरणात काम करताना, तसेच मित्रांच्या आणि परिसराशी जुळवून घेताना महागडे कपडे, फॅशन, चैनीच्या वस्तू वापरण्याकडे त्यांचा कल वाढतो.
नोकरीच्या ठिकाणी घर घेण्याची धडपड - आयटीत जॉब म्हणजे स्टेटस बनले आहे. त्यामुळे स्टेटस जपण्यासाठी किंवा अपेक्षांच्या ओझ्याखाली नोकरीच्या भरवशावर जेथे कंपनी आहे तेथेच फ्लॅट घेण्याचा आटापिटा ही मंडळी करतात. यातूनच अवाजवी कर्ज, क्रेडिट कार्डाचा अतिवापर यामुळे खर्चाची बाजू फुगते.
नोकरी टिकविण्यासाठी स्पर्धा - आयटी क्षेत्रात पूर्वीसारखी कामाची शाश्वती नसल्याने काम टिकविण्यासाठी जीवघेणी स्पर्धा सुरु झाली आहे. अनुषंगाने क्लायंट प्रेशर, कामाची डेडलाइन यांचा ताण असतोच. त्यातच पूर्वी एखाद्या किचकट प्रोजेक्टला इतर अभियंते मदत करायचे; आता मात्र तसे नाही. तो किचकट प्रोजेक्टदेखील एकट्यानेच आणि वेळेत पूर्ण करायचा, अशी अट आहे.
अपग्रेड आणि अपडेटचा अभाव - आयटीतील टेक्नॉलॉजीत सातत्याने प्रचंड आधुनिककरण होत आहे. मात्र, आयटीयन्सकडे पूर्वापार चालत आलेले जुने एज्युकेशन आहे. ते काळाची पावले ओळखून अपग्रेड आणि अपडेट राहत नाहीत. त्यामुळे या फिल्डमध्ये तग धरणे कठीण होत चालले आहे.
वाढती व्यसनाधीनता - कुटुंबापासून दूर आणि कोणाच्याही अधिपत्याखाली न राहता स्वच्छंद आणि मनसोक्त लाईफ जगण्याची सवयच जणूकाही तरुण-तरुणींना लागलेली असते. त्यामुळे ते सेल्फ मॅनेजमेंट न करता, कशाचीही काळजी न करता विरंगुळा आणि करमणूक म्हणून पावले व्यसनाकडे वळतात.

डिप्रेशनमधून आत्महत्या
आयटीचा डोलारा आणि फुगा जेवढा आपल्याला मोठा दिसतो. त्या मानाने ही इंडस्ट्री तेवढीच असुरक्षित आहे. धावपळ, स्पर्धा यांच्या पाचवीला पुजलेली असते. सतत टार्गेट आणि डेडलाइन या जाळ्यात हे गुरफटलेले असतात. एखादे काम वेळेत पूर्ण न झाल्यास काम थांबविण्याची टांगती तलवार असते. त्यामुळे स्वत:च्या रिलेशनशिपकडे, घराकडे लक्ष देता येत नाही. यातूनच कोठेतरी हा वर्ग डिप्रेशनमध्ये जातो आणि असे टोकाचे पाऊल उचलले जाते.
- डॉ. धनंजय अष्ठुळकर (मानसोपचार तज्ज्ञ)
काळाची पावले ओळखून स्वत:त
बदल करावा
सातत्याने आयटी इंडस्ट्रीत मोठा बदल होत आहे. नवनवीन टेक्नॉलॉजी येत आहे. त्यानुसार तुम्ही जुने सोडून स्वत:मध्ये नवीन टेक्नॉलॉजी अपग्रेड आणि अपडेट केली पाहिजे. काळाची पावले ओळखून त्यानुसार स्वत:मध्ये बदल करण्याला पर्याय नाही.
- अनिल पटवर्धन, मॅनेजिंग कमिटी मेंबर आॅफ एचआयए

पॅकेजची अनिश्चितता - सात-आठ वर्षांपूर्वी आयटी इंडस्ट्रीत कामाचा अनुभव नसला, तरी पॅकेज चांगले मिळायचे. मात्र आता फ्रेशरला सुमारे २० ते ३० च्या दरम्यान (मंथली), तर अनुभवी अभियंत्यांना ३५ ते ८०च्या आसपास असते.
वाढलेल्या अपेक्षांचे ओझे - आयटीत जॉब म्हटले, की मुलांकडून आई-वडिलांच्या अपेक्षा प्रचंड वाढतात. त्यांना वाटते आता आपली परस्थिती पालटणार, आपल्याला चांगले दिवस येणार; मात्र या अपेक्षा बहुतेक मुले पूर्ण करू शकत नसल्याने कुठेतरी नाराजी, निराशा वाढत आहे.
आॅफर लेटरमध्ये नसते हमी - एखादी आयटी कंपनी संकटात असली, तर तुम्हाला टर्मिनेट करण्याचा अधिकार कंपनीला आहे, असे ठळक नियम आॅफर लेटरवर असतात.

नकार पचवता न येणे -
अविवाहित आणि पास आउट होऊन नुकतेच जॉबला लागलेल्या तरुणांचे नैराश्यामधून आत्महत्या करण्याचे प्रमाण अधिक आहे. बहुतेक ही फ्रेशर मुले प्रेमात असतात आणि समोरील मुलीने अथवा मुलाने नकार दिला तो पचविणे त्यांना अवघड जाते. कॉलेज लाईफ आणि आयटीत नोकरी यात प्रचंड तफावत : सर्वजण कॉलेज लाईफ मजा-मस्ती करत फुल टू धमाल करून अतिशय खेळीमेळीने दिवस घालवतात. मात्र कॉलेज आणि आयटीतील नोकरी या दोन आयुष्यांत प्रचंड तफावत आहे. येथील प्रोफेशनलपणा आणि दबाव काहींना सहन होत नाही.

Web Title:  ITIs struggling with targets and deadlines, increasing suicide is a matter of concern

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.