पिंपरी : केंद्र सरकारने ‘जेएनएनयूआरएम’अंतर्गतच्या १८ प्रकल्पांसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेला मंजूर केलेला ७०० कोटींहून अधिक रुपयांचा निधी प्रकल्प वेळेत पूर्ण न झाल्याने परत जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ‘जेएनएनयूआरएम’अंतर्गत महापालिकेने विविध १८ प्रकल्प हाती घेतले होते. मात्र आठ वर्षांनंतरही यातील बहुतांश प्रकल्प पूर्णत्वास गेलेले नाहीत. हे १८ प्रकल्प २ हजार ५८५ कोटी ३९ लाख रुपये खर्चाचे आहेत. त्यामध्ये केंद्राचा १ हजार २३६ कोटी ४४ लाख रुपये आणि राज्याचा ७७१ कोटी ८४ लाख रुपये असा एकूण १ हजार ८१३ कोटी ३५ लाख रुपयांच्या हिश्श्याचा समावेश आहे. तसेच महापालिकेने स्वत:चे ७२२ कोटी ५४ लाख रुपये खर्च करणे अपेक्षित आहे. प्रकल्पांच्या कामांनुसार हा निधी दिला जातो. या प्रकल्पांसाठी केंद्र सरकारकडून आतापर्यंत १ हजार ५ कोटी ८३ लाख रुपये आणि राज्य सरकारकडून ४६० कोटी ६७ लाख रुपयांचा निधी महापालिकेला प्राप्त झाला आहे. मात्र, प्रकल्पांची कामे रखडल्याने ३६१ कोटी १६ लाख रुपयांचा निधी केंद्र व राज्य सरकारने महापालिकेला दिलेला नाही. हे सर्व प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने मार्च २०१७ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. अन्यथा रखडलेल्या प्रकल्पांसाठी मिळालेला निधी केंद्राला ९ टक्के व्याजासह परत करावा लागणार आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबविताना महापालिकेने निगडी, पेठ क्रमांक २२ मध्ये ‘रेड झोन’च्या हद्दीत हा प्रकल्प राबविला. त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण होईल की नाही याबाबत प्रश्नचिन्ह आहे. या प्रकल्पासाठी १७२ कोटी रुपये मिळाले होते. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाकर्तेेपणामुळे शहरावर ही वेळ येणार असून, याची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस स्वीकारणार का, असा सवाल नगरसेविका सीमा सावळे व आशा शेंडगे यांनी केला आहे. (प्रतिनिधी)
‘जेएनएनयूआरएम’चे ७०० कोटी जाणार परत
By admin | Published: September 16, 2015 2:43 AM