सांगवी : नवी सांगवी येथील साई चौक ते माहेश्वरी चौकादरम्यान जॉगिंग ट्रॅकचे काम महापालिकेच्या स्थापत्य विभागाकडून प्रगतिपथावर आहे. असे असताना महापालिकेकडून साई चौकातून माहेश्वरी चौकाकडे जाणाऱ्या जॉगिंग ट्रॅकचे काम थांबवण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. महापालिकेकडून राहिलेले उर्वरित काम पुन्हा मार्गी लावावे, अशी नागरिकांनी मागणी केली आहे.
साई चौकातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मोकळ्या मैदानालगत फेमस चौक, चैत्रबन सोसायटी येथून येणारा जुना नाला आहे. त्या नाल्याला अंतर्गत वाहनी टाकून रस्त्याच्या खालून साई चौक ते अहिल्याबाई होळकर घाट येथे पवना नदीत जोडले आहे. या नाल्यावरील भागाचा उपयोग जॉगिंग ट्रॅक होण्याअगोदर मद्यपी व जुगार खेळणारे तसेच टवाळखोर करीत होते. एकांत व अंधाराचा फायदा घेऊन येथे रात्री मद्य पिऊन बाटल्या फेकणे, सिगारेट, इतर वस्तू टाकण्याचे प्रमाण वाढले होते. त्यासाठी पोलीस प्रशासनाने अनेक वेळा कारवाई करूनही येथे सुधारणा दिसून आली नाही. त्यावर उपाय म्हणून महापालिका स्थापत्य विभागाकडून येथील नाल्यावरील ७०० मीटर लांबीचा भाग नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला.येथे दोन्ही बाजूंनी संरक्षित जाळी बसवण्यात येऊन सदर जॉगिंग ट्रॅकची रुंदी ३ मीटर तर १२ फूट उंच जाळी दोन्ही बाजूंनी सिमेंट भिंतीच्या मध्ये बसवण्यात आल्या आहेत. त्यामुळे जॉगिंग ट्रॅकची सुरक्षा व सौंदर्यात यामुळे भर पडली. परंतु जॉगिंग ट्रॅकचे जवळपास शंभर फूट काम काहीमहिन्यांपासून बंद आहे.
हा भाग पुढे विकसित न केल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. या ठिकाणची जाळी व रंगरंगोटीचे काम पूर्ण झाले आहे. केवळ पेव्हिंग ब्लॉक व स्वच्छता न झाल्याने याचा उपयोग नागरिकांना होत नसून महापालिकेकडून पुढील काम त्वरित करून नागरिकांची गैरसोय टाळावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.