कामशेत : अंदर मावळातील अतिदुर्गम भागातील कळकराई (सावळा) या गावात मागील आठ महिन्यांपासून विजेची एक लाईन बंद आहे तर दुसरी लाईन वरील वीज ग्राहकांना कमी लाईट असल्याने अर्धे गाव अंधारात बुडाले आहे. या भागात वीज रिडींग घेण्यासाठी वीज बिल देण्यासाठी कोणीही येत नसून बिल हे अंदाजे मिळत आहे. याविषयी महावितरण व वायरमन यांच्याकडे वारंवार तक्रार करूनही वीज वितरण मंडळाकडून दखल घेतली जात नसल्याची ग्रामस्थ तक्रार करीत आहेत. कळकराई गावाकडे जाण्यासाठी अंदर मावळातील सावळा येथून मार्ग असून या दुर्लक्षित गावाला अजूनही रस्ता नाही. कळकराई मध्ये मागील पाच ते सहा वर्षांपूर्वी वीज पोहचली आहे. गावात सुमारे पंचवीस वीज ग्राहक असून गावात आलेल्या दोन वीज लाईन वर हे कनेक्शन आहेत. मात्र या दोन लाईन पैकी एक लाईन अद्यापही बंद आहे. त्यामुळे कळकराई हा अर्धा गाव अंधारात आहे. या लाईन ला काय बिघाड आहे हे महावितरण कर्मचाऱ्यांच्या अजूनही लक्षात आले नाही. त्यामुळे दुरुस्ती रखडली आहे. तर दुसरी लाईन वरून होणारा वीज पुरवठा हा कमी दाबाचा होत असल्याने ग्रामस्थांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. गावात पीठ गिरणी असूनही विजे अभावी महिलांना डोक्यावर दळणाचे ओझे घेऊन दोन तासांनी पायपीट करून चार किलोमीटर चा घाट चालून दळणा साठी वणवण करावी लागत आहे अशी माहिती चंद्रकांत कावळे यांनी दिली. या गावात सुमारे पंचवीस वीज ग्राहक असून आजपर्यंत वीज मीटर रिडींग नेण्यासाठी येथे कोणीच फिरकले नाही. येथील सवार्नाच महावितरण मंडळाकडून अंदाजे ४०० पासून ते १५०० रुपयांपर्यंत वीज बिल येत असून ते बिल घरपोच पोहचवले ही जात नाही. वीज सुरू नसतानाही आपली वीज कनेक्शन कट होऊ नये, शिवाय पुढील बिलात वाढीव बिल लागून येऊ नये आदी कारणांच्या भितीमुळे हे ग्राहक कुरबुर न करता लाईट बंद असतानाही वेळी अवेळी येणारी वीज बिल भरत आहेत. वीज वितरण कार्यालय व वायरमन याना वारंवार फोन करून भेटून समस्या मांडली तरी कोणी लक्ष देत नाही. त्यामुळे आपल्या भागातील विजेची समस्या सुटावी म्हणून आग्रहास्तव आलेल्या एका वायरमनने प्रत्येका कडून पन्नास शंभर असे पैसे घेतले मात्र त्या नंतर तो या भागात परत फिरकलाच नसल्याची तक्रार ग्रामस्थ करीत आहेत.
मावळातील कळकराई गाव अर्धे अंधारात; ८ महिन्यांपासून वीज बंद, महावितरणचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 1:08 PM
अंदर मावळातील अतिदुर्गम भागातील कळकराई (सावळा) या गावात मागील आठ महिन्यांपासून विजेची एक लाईन बंद आहे तर दुसरी लाईन वरील वीज ग्राहकांना कमी लाईट असल्याने अर्धे गाव अंधारात बुडाले आहे.
ठळक मुद्देमहावितरण व वायरमन यांच्याकडे वारंवार तक्रार करूनही वीज वितरण मंडळाकडून दखल नाहीअंदाजे ४०० पासून ते १५०० रुपयांपर्यंत बिल येत असून ते घरपोचही पोहचवले जात नाही