‘कट्यार काळजात’ने जिंकली मने; पिंपरी चिंचवडमध्ये दीनानाथ मंगेशकर संगीत नाट्य महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 01:00 PM2018-01-10T13:00:09+5:302018-01-10T13:06:02+5:30
प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात मा. दीनानाथ मंगेशकर संगीत नाट्य महोत्सव सुरू आहे. त्यात ‘संगीत कट्यार काळजात घुसली’ या संगीत नाटकाने रसिक मनावर गारूड केले.
पिंपरी : नादब्रह्म परिवाराच्या वतीने प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात मा. दीनानाथ मंगेशकर संगीत नाट्य महोत्सव सुरू आहे. त्यात ‘संगीत कट्यार काळजात घुसली’ या संगीत नाटकाने रसिक मनावर गारूड केले.
डॉ. वसंतराव देशपांडे यांनी अजरामर केलेल्या नाटकाचा पुनर्नुभव उपस्थितांनी घेतला. संगीतातील घराणेशाही चित्रित करणाऱ्या या नाटकाद्वारे संगीत उपासकांना बऱ्याच गोष्टी शिकविल्या आहेत. फिरता रंगमंच नसतानाही नाटकात बॅक दाखवताना काही क्षणात रंगमंचावरील बदल करणे हेही आजच्या नाटकाचे वैशिष्ट्य होते.
नाटकाचा विषय, मांडणी मनाचा वेध घेणारी असून गायकांनी आपापल्या गायनाने स्वरसाज चढवून नाटक एका वेगळ्या उंचीवर नेले. खां साहेब आफताब हुसेन (रवींद्र घांगुर्डे), सदाशिव (संजीव मेहेंदळे), झरीना (डॉ. वंदना घांगुर्डे), उमा अस्मिता चिंचाळकर) या गायक नटासोबतच कवी बाके बिहारी (अनंत कान्हो) सारख्या गद्य संवाद असणाऱ्या पात्रांनीही रसिकांची भरपूर दाद मिळवली.
नाटकास तबला- विघ्नहरी देव, संवादक उदय कुलकर्णी, व्हायोलीन-अविनाश लघाटे, अशी समर्पक साथ होती. शब्द, सूर कानात साठवूनच रसिक प्रेक्षागृहातून परतले.