दारूच्या पैशांसाठी पत्नीचा निर्घृण खून करणारा अवघ्या १३ दिवसांत कामशेत पोलिसांकडून जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 06:24 PM2018-01-23T18:24:42+5:302018-01-23T18:29:57+5:30
इंद्रायणी कॉलनीत दारू पिण्यासाठीच्या पैशांवरून पती पत्नीत झालेल्या वादातून चिडून जाऊन पत्नीचा मानेवर धारधार हत्याराने वार करून निर्घृण खून करून पसार झालेल्या दारुड्या पतीला पकडण्यात कामशेत पोलिसांना मंगळवारी यश आले.
कामशेत : येथील इंद्रायणी कॉलनीत दारू पिण्यासाठीच्या पैशांवरून पती पत्नीत झालेल्या वादातून चिडून जाऊन पत्नीचा मानेवर धारधार हत्याराने वार करून निर्घृण खून करून पसार झालेल्या दारुड्या पतीला पकडण्यात कामशेत पोलिसांना मंगळवारी यश आले.
या प्रकरणी कामशेत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आय एस पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रकांत कांबळे, पोलीस हवालदार समीर शेख, पोलीस नाईक वैभव सकपाळ, विशाल बोऱ्हाडे, राम कानगुडे, संतोष घोलप व संदीप शिंदे यांच्या टीमने मिळालेल्या माहितीनुसार आरोपी हिरामण बसप्पा कांबळे (वय ४१) यास मंगळवार (दि. २३) रोजी पुणे स्टेशन परिसरातून ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रकांत कांबळे करीत आहेत.
हिरामण बसप्पा कांबळे (वय ४१), रुपाली हिरामण कांबळे (वय ३५), दोन मुले कुणाल व कुशल (वय १० व ५ वर्ष ) हे कुटुंब कामशेत मधील इंद्रायणी कॉलनीत गणपती मंदिराच्या बाजूस रुपाली हिच्या भावाच्या मालकीच्या घरात राहण्यास होते. हिरामण कांबळे हा व्हीपीएस हायस्कूल लोणावळा येथे शिपाई पदावर नोकरीस होता. त्याला दारूचे व्यसन होते. यावरून दारूच्या नशेत तो आपल्या पत्नीला नेहमीच मारहाण करीत असे. दारू पिण्यासाठी पैसे मागत असे. यावरून दोघांमध्ये कायम वाद होत असत. यातूनच गुरुवार (दि. ११) रोजी सकाळी ९ ते १० वाजण्याच्या सुमारास हिरामण कांबळे याने त्याची पत्नी रुपालीच्या मानेवर डाव्याबाजूस धारधार हत्याराने मारून तिचा खून करून कपड्याची बॅग भरून पोबारा केला होता. या प्रकरणी महिलेच्या भावाने पोलिसात फिर्याद दिली होती.