लोणावळ्यातील एकविरा देवीच्या मंदिराचा कळस चोरी प्रकरणाचा तपास आता एलसीबीकडे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2017 08:40 PM2017-11-14T20:40:36+5:302017-11-14T20:40:48+5:30

कार्ला गडावरील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या कुलस्वामिनी एकविरा देवीच्या मंदिराचा कळस चोरी झाल्याच्या घटनेला 40 दिवस लोटले तरी स्थानिक पोलीसांना आरोपींचा शोध लागत नसल्याने सदर कळस चोरीचा तपास पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे प्रकटीकरण पथक (एलसीबी) कडे वर्ग करण्यात आला आहे.

Lcb now investigating the theft of Ekvira Devi temple in Lonavla | लोणावळ्यातील एकविरा देवीच्या मंदिराचा कळस चोरी प्रकरणाचा तपास आता एलसीबीकडे

लोणावळ्यातील एकविरा देवीच्या मंदिराचा कळस चोरी प्रकरणाचा तपास आता एलसीबीकडे

Next

लोणावळा : कार्ला गडावरील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या कुलस्वामिनी एकविरा देवीच्या मंदिराचा कळस चोरी झाल्याच्या घटनेला 40 दिवस लोटले तरी स्थानिक पोलीसांना आरोपींचा शोध लागत नसल्याने सदर कळस चोरीचा तपास पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे प्रकटीकरण पथक (एलसीबी) कडे वर्ग करण्यात आला आहे.

कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज कार्ला एमटिडीसी येथे एकविरा देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाची बैठक पार पडली. कळस चोरीच्या प्रकरणानंतर वेहेरगाव ग्रामस्त व स्थानिक विश्वस्त यांनी प्रकरणाला वेगळे वळण देत देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अनंत तरे हटाव ही मोहिम राबवत, बाजारपेठ बंद ठेवली, रास्ता रोको केले. तदनंतर स्थानिक विश्वस्तांनी मागणी बैठक बोलवत परस्पर नविन कार्यकारणी जाहिर केल्याने विश्वस्त मंडळात दोन गट पडले आहेत. यावरुन स्थानिक ग्रामस्त व भाविक असा नवा वाद पेटला आहे. 

दोन्ही गटाकडून एकमेकांच्या विरोधात आरोप प्रत्यारोप व तक्रारी दाखल होऊ लागल्याने एकविरा देवीच्या गडावरील वातावरण अशांत झाले आहे. याचे पडसाद राज्यातील विविध भागात उमटू लागले आहेत. या वादामधून काही अनुचित घटना घडू नये तसेच देवस्थानचे पावित्र्य व नावारुपाला गालबोट लागू नये याकरिता हा विषय सामोपचाराने मिटवावा असा सल्ला विश्वास नांगरे पाटील यांनी दोन्ही गटाला आज दिला. नांगरे पाटील म्हणाले आम्ही दोन्हि गटाची कायदेशिर बाजु ऐकून घेतली आहे. मात्र त्यावर आम्ही भाष्य करणार नाही. धर्मदाय आयुक्त योग्य तो निर्णय घेतील.

कळस चोरीचा तपास देखिल योग्य पध्दतीने सुरु असून स्थानिक गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्याकडे सदर कळस चोरीचा तपास देण्यात आला असून लवकरच आरोपी निष्पन्न करु असा विश्वास नांगरे पाटील यांनी बोलताना व्यक्त केला. यावेळी अपर पोलीस अधिक्षक तेजस्विनी सातपुते, लोणावळा उप विभागीय पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर शिवथरे, पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक साधना पाटील, उपनिरीक्षक बालाजी गायकवाड उपस्थित होते.


कळस चोराला पकडणार्‍या पथकाला 1 लाखांचे बक्षिस

एकविरा देवीच्या मंदिराचा कळस चोरी झाल्याने भाविक‍ांमध्ये संतापाची लाट आहे. या चोरीच्या तपासाचा पाठपुरावा करण्याऐवजी स्थानिक ग्रामस्तांनी राजकारण करत अनंत तरे हटाव ही मोहिम राबवली. चोरीच्या घटनेला दिड महिना झालेला असताना चोर सापडत नसल्याने भाविकांमध्ये खदखद आहे. या चोरीचा शोध लावत चोराला ताब्यात घेणार्‍या पथकाला 1 लाख रुपयांचे बक्षिस देवस्थानचे अध्यक्ष अनंत तरे यांनी जाहिर केले आहे.

Web Title: Lcb now investigating the theft of Ekvira Devi temple in Lonavla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा