पिंपरी : अनेक गंभीर गुन्ह्यामुळे शहरातून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आलेला रावण टोळीचा म्होरक्या ससा ऊर्फ सागर दशरथ वाघमोडे याला पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अॅन्टी गुंडा स्कॉड पथकाने एक देशी पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसांसह अटक केली आहे. ही कारवाई आकुर्डी येथील रेल्वे स्थानक परिसरात केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ससा ऊर्फ सागर दशरथ वाघमोडे हा पिंपरी-चिंचवड शहरात सक्रिय असलेल्या रावण टोळीचा सूत्रधार आहे. त्याच्या विरोधात पिंपरी, चिंचवड, देहूरोड आणि पुणे शहरात विविध ठिकाणी गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. यामध्ये खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, दंगल, मारामारी यासारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे. तो मागील वर्षापासून शहरात दहशत पसरवण्याचा प्रयत्न करीत होता. त्यामुळे, त्याच्यावर मागील वर्षीही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. मात्र, ही कारवाई झाल्यानंतरही त्याच्या वर्तनामध्ये कसलीही सुधारणा झाली नाही. त्यामुळे, त्याला जानेवारी २०१९ मध्ये पुन्हा पुणे जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले होते. मात्र हा आदेश जुगारून तो शहरातच वावरत होता.
सोमवारी अॅन्टी गुंडा स्कॉड या पथकाला शहरातून तडीपार केलेला ससा ऊर्फ सागर हा शहरातील आकुर्डी रेल्वे स्थानक परिसरात असल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने रेल्वे स्थानक परिसरात सापळा रचून ससा ऊर्फ सागर वाघमोडे याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ एक देशी बनावटीचे पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी ती जप्त करून त्याला अटक केली आहे.
मागच्या काही दिवसांपूर्वी शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी अॅन्टी गुंडा स्कॉडची निर्मिती केली. या स्कॉडच्या माध्यमातून शहरात गुन्हेगारावर नजर ठेवण्यात येत आहे. या स्कॉडची जबाबदारी पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे यांच्याकडे देण्यात आली आहे.