गॅस एजन्सींकडून ग्राहकांची लुबाडणूक, घरपोच सेवेसाठी आकारले जातात अधिक पैसे; वजन करून सिलिंडर देण्यास नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 06:15 AM2017-12-21T06:15:24+5:302017-12-21T06:15:51+5:30

गॅस एजन्सीकडून होणा-या लुबाडणुकीविरोधात येथील काही ग्राहकांनी आवाज उठविला आहे. सिलिंडर वितरणाचे स्टिंग आॅपरेशन करून सोशल मीडियावर त्याच्या क्लिप व्हायरल केल्या आहेत.

 Loss of customers by gas agencies, home based services are charged; Refuse to give cylinders by weight | गॅस एजन्सींकडून ग्राहकांची लुबाडणूक, घरपोच सेवेसाठी आकारले जातात अधिक पैसे; वजन करून सिलिंडर देण्यास नकार

गॅस एजन्सींकडून ग्राहकांची लुबाडणूक, घरपोच सेवेसाठी आकारले जातात अधिक पैसे; वजन करून सिलिंडर देण्यास नकार

Next

कामशेत : गॅस एजन्सीकडून होणा-या लुबाडणुकीविरोधात येथील काही ग्राहकांनी आवाज उठविला आहे. सिलिंडर वितरणाचे स्टिंग आॅपरेशन करून सोशल मीडियावर त्याच्या क्लिप व्हायरल केल्या आहेत.
शहरात एचपी व भारत गॅस एजन्सीचे ग्रामीण वितरक आहेत. सिलिंडर घरपोच करण्यासाठी अतिरिक्त रक्कम आकारली जाते. त्याची पावती दिली जात नाही. सिलिंडर वजन करून दिले जात नाही. रकमेबाबत छपाई न करता पावती दिली जाते. रहिवासी परिसरात जादा सिलिंडरचा स्टॉक करून ठेवला जातो. अनुचित घटना घडल्यास अग्निशामक यंत्रणा, उपाययोजना कार्यान्वित नाही.
सर्वसामान्य ग्राहकांना ज्या मोफत सुविधा दिल्या जातात त्याची माहिती दिली जात नाही आदी समस्यांच्या संदर्भात ग्रामपंचायत, गटविकास अधिकारी, तहसीलदार आदी प्रशासकीय यंत्रणेकडे पाठपुरावा करून, उपोषण करूनही मार्ग निघत नसल्याने ग्राहकांनी सकाळी स्टिंग आॅपरेशन केले. याबाबत व्हिडीओ व फोटो सोशल मीडियावर शेअर केले.
मंगळवारी सकाळी ११च्या सुमारास भारत गॅस एजन्सीची सिलिंडर वाहतूक करणारे वाहन जुना मुंबई-पुणे महामार्गावर पंचशील कॉलनीतील लोकांना सिलिंडर वाटप करण्यासाठी आले असता, ग्राहकांनी नजर ठेवत पाहणी केली. त्या वेळी एक सिलिंडरमागे अतिरिक्त ३० ते १०० रुपये अशी मनमानी रक्कम घेतली जात असल्याचे मनोज धावडे व सहदेव केदारी यांच्या निदर्शनास आले. त्यांनी संबंधित वाहनचालकाला हटकले असता सिलिंडर वजन करण्यासाठीचा वजनकाटाही नव्हता. अतिरिक्त रकमेची पावतीही दिली जात नव्हती. याची त्यांनी विचारणा केली असता, वजनकाटा एजन्सीकडून आम्हाला मिळाला नाही असे उत्तर दिले. संबंधित गॅस एजन्सीचे व्यवस्थापक तिथेच होते. ते हा सर्व प्रकार पाहत होते. या विषयी त्यांना प्रश्न विचारले असता त्यांनी तेथून काढता पाय घेतला.
अतिरिक्त पैसे देऊनसुद्धा कर्मचाºयांची अरेरावी असते. सिलिंडर स्वत: गाडीतून उतरवून घेणे, रिकामा सिलिंडर गाडीत ठेवणे आदी कामे ग्राहकांनाच करावी लागत आहेत. स्वत:चा सिलिंडर घरापर्यंत उचलून न्यावा लागत आहे. काही रिक्षावाल्यांकडे सिलिंडर पोहोचवण्याची जबाबदारी दिली जात असून, त्यांचे वेगळे भाडे ग्राहकाच्याच माथी मारले जात आहे. नागरिकांना या सर्वांची माहिती असतानाही पुढच्या वेळी सिलिंडर वेळेवर भेटणार नाही या भीतीने ग्राहक तक्रार करण्यास कचरत आहेत. याचाच फायदा घेऊन एजन्सीच्या कर्मचाºयांकडून घेतला जाऊन ग्राहकांची मोठी लूट होत आहे.
तहसीलदार, पुरवठा विभाग, वडगाव मावळ कार्यालयातील संबंधित अधिकाºयांनी या विषयी तातडीने दखल घेतली नाही, तर येत्या आठ दिवसांत कामशेत व आजूबाजूच्या गॅसग्राहकांच्या वतीने तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितले.
कामशेत शहरातील कचरा समस्या, तसेच गॅस एजन्सीकडून सिलिंडरधारकांची होणारी लुबाडणूक आदी महत्त्वाच्या विषयांसाठी शहरातील जागरूक नागरिक संजय पडवकर, मनोज धावडे, सहदेव केदारी व अन्य यांनी वडगाव येथील पंचायत समिती कार्यालयाच्या बाहेर सोमवारी (दि. ४) लाक्षणिक उपोषण केले होते. यात विजय काजळे, अंकुश कचरे, चंदू परचंड, वसंत काळे, उपसरपंच कामशेत काशिनाथ येवले, भूमाता ब्रिगेड पुणे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय पोंधे आदींनी सहभाग घेतला. दिवसभर उपोषणकर्त्यांची कोणत्याही शासकीय अधिकाºयाने भेट अथवा दखल घेतली नाही. यावर वरिष्ठ स्तरावरील अधिकाºयांकडून संबंधित अधिकाºयांची चौकशी व्हावी अशी उपोषणकर्त्यांनी मागणी केली होती. पण त्यालाही संबंधितांकडून केराची टोपली दाखवण्यात आली. या प्रश्नावर अद्यापही प्रशासनाकडून कोणतीही कारवाई झाली नसल्याने उपोषणकर्त्यांनी त्यांचा निषेध करून ग्राहकांमध्ये जनजागृतीची भूमिका घेऊन हे स्टिंग आॅपरेशन केल्याचे सांगण्यात आले. ग्राहकांची होणारी लूट, त्यांच्या अडचणी याबाबत गॅस एजन्सी चालक, व्यवस्थापकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.
जादा आकारणी : तक्रार केल्यास विलंब
सिलिंडरची मूळ किंमत ही ७२० रुपये असून, घरपोच सेवेसाठी १८.५० पैसे जादाने आकारून किंमत ७३८.५० होते. मात्र गॅसधारक ७४० रुपयेच अदा करतात. त्यातही सिलिंडर घरपोच करणारे कर्मचारी हे कामशेतमधील ग्राहकांकडून सिलिंडरमागे ३० किंवा त्यापेक्षा जास्त रुपये घेतात. ग्रामीण भागातील ग्राहकांकडून सिलिंडरमागे किमान ५० किंवा अधिक रुपये घेतात. त्याची पावती दिली जात नाही. हा सर्व प्रकार ग्राहकही गेली अनेक वर्षे निमूटपणे सहन करीत आहेत. याबाबत काही ग्राहकांनी सांगितले की, आम्हाला ही सिलिंडरची मूळ किंमत, शिवाय जास्त पैसे आकारले जातात, हे माहीत आहे. पण आज याबाबत तक्रार केली, तर पुढील वेळेस कर्मचारी जाणूनबुजून आमचा सिलिंडर उशिराने देतात किंवा आणतच नाहीत. सिलिंडर आणण्यासाठी रिक्षाला ३० ते ५० रुपये द्यावे लागतात.

Web Title:  Loss of customers by gas agencies, home based services are charged; Refuse to give cylinders by weight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.