पिंपरी चिंचवड महापालिकेत विषय समित्यांवर '' महिलाराज ''
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 08:19 PM2019-05-20T20:19:43+5:302019-05-20T20:22:06+5:30
सत्ताधारी भाजपचे पाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन आणि शिवसेनेच्या एका सदस्याची प्रत्येक समितीत निवड झाली.
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विधी समिती, महिला व बालकल्याण समिती, शहर सुधारणा समिती आणि क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीत नवीन सदस्यांची सोमवारी महासभेत निवड करण्यात आली. या चारही समित्यांमध्ये नऊ सदस्य आहेत. पक्षीय बलाबलानुसार सत्ताधारी भाजपचे पाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन आणि शिवसेनेच्या एका सदस्याची प्रत्येक समितीत निवड झाली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेची मे महिन्याची सर्वसाधारण सभा सोमवारी झाली. महापौर राहुल जाधव सभेच्या अध्यक्षस्थानी होते. या सभेत सभागृह नेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने, शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी बंद पाकिटातून समितीत नियुक्त करण्यात येणाऱ्या पक्षाच्या सदस्यांची नावे महापौर राहुल जाधव यांच्याकडे दिली. त्यानंतर महापौर जाधव यांनी समितीच्या सदस्यांची नियुक्ती झाल्याचे जाहीर केले. सदस्य नियुक्तीनंतर सभा तहकूब करण्यात आली. तहकूब सभा ६ जून रोजी होईल.
* समित्यांमध्ये भाजपाच्या १२, राष्ट्रवादीच्या ८ तर शिवसेनेच्या २ नगरसेविका
विषय समित्यांमध्ये महिलाराज असल्याचे दिसून येते. प्रत्येक समितीत नऊ याप्रमाणे चार समित्यांसाठी ३६ सदस्यांची नियुक्ती झाली. यात २२ नगरसेविकांचा समावेश आहे. भाजपाच्या १२, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ८ तर शिवसेनेच्या २ नगरसेविकांची सदस्यपदी वर्णी लागली. महिला व बालकल्याण समितीत सर्व सदस्य महिला आहेत. विधी समितीत शिवसेनेचे प्रमोद कुटे वगळता सर्व सदस्य महिला आहेत. तसेच शहर सुधारणा समितीत चार तर क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीत एक महिला सदस्य आहे.
* विधी समिती : अश्विनी बोबडे, कमल घोलप, उषा ढोरे, मनीषा पवार, अनुराधा गोरखे (भाजप), उषा वाघेरे, उषा काळे, सुलक्षणा धर (राष्ट्रवादी काँग्रेस), प्रमोद कुटे (शिवसेना)
* महिला व बालकल्याण समिती : भीमाबाई फुगे, निर्मला कुटे, साधना मळेकर, उषा मुंडे, सुजाता पालांडे (भाजप), सुमन पवळे, निकिता कदम, अनुराधा गोफणे (राष्ट्रवादी काँग्रेस), अश्विनी चिंचवडे (शिवसेना)
* शहर सुधारणा समिती : राजेंद्र लांडगे, लक्ष्मण सस्ते, कैलास बारणे, सुनीता तापकीर, आशा शेंडगे (भाजप), वैशाली घोडेकर, संतोष कोकणे, संजय वाबळे (राष्ट्रवादी काँग्रेस), रेखा दर्शले (शिवसेना)
* क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती : तुषार हिंगे, अभिषेक बारणे, बाबासाहेब त्रिभुवन, विकास डोळस, सागर गवळी (भाजप), राजू मिसाळ, अपर्णा डोके, विनोद नढे (राष्ट्रवादी काँग्रेस), नीलेश बारणे (शिवसेना)