पिंपरीत भररस्त्यात तरुणीची छेडछाड; जाब विचारला असता चेहऱ्यावर ॲसिड फेकण्याची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2021 01:53 PM2021-09-05T13:53:22+5:302021-09-05T13:53:30+5:30
हिंजवडी पोलीस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल
पिंपरी : भररस्त्यात तरुणीसोबत गैरवर्तन करून शिवीगाळ केली. त्याचा जाब विचारला असता, चेहऱ्यावर ॲसिड फेकीन, अशी धमकी दिल्याप्रकरणी एकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दत्तवाडी नेरे चौकात ३० ऑगस्टला सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. पीडित तरुणीने याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात शनिवारी (दि. ९) फिर्याद दिली. नितीन खंडू शेळके (वय ३५, रा. चांदखेड, ता. मुळशी), असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी व त्यांचे वडील काम संपवून रिक्षानं घरी जात असताना शेळके हा दुसऱ्या रिक्षातून पाठीमागून आला. त्यानं फिर्यादी यांच्या रिक्षाला स्वतःची रिक्षा आडवी लावली. फिर्यादीला त्यांच्या रिक्षातून खाली उतरवले. तू माझ्या संगे चल मी तुझ्या बरोबर लग्न केलंय, असं म्हणून शेळकेने भररस्त्यात फिर्यादीसोबत गैरवर्तन केले.
त्याबाबत फिर्यादीच्या वडिलांनी त्याला जाब विचारला असता आरोपीने त्यांना शिवीगाळ केली. फिर्यादीच्या आई-वडिलांना जीवे मारून टाकीन व चेहऱ्यावरती ॲसिड फेकीन, अशी धमकी देऊन आरोपी पळून गेला. आरोपीने फिर्यादी सोबत भररस्त्यात गैरवर्तन केले. फिर्यादीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य आरोपीने केले, असे फिर्यादीत नमूद केले आहे.