पिंपरी : दारूच्या नशेत झालेल्या भांडणाचा राग मनात धरून सुरीने गळा चिरून मित्राचा खून करून फरार झालेल्या तरुणाला पोलिसांनी १२ तासांत बेड्या ठोकल्या. तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वराळे येथे गुरुवारी (दि. २) खुनाचा हा प्रकार उघडकीस आला होता. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने ही कारवाई केली.
पिंटू रामतेणू मंडल (वय २०, रा. कालीयाचेक, जि. मालदा, पश्चिम बंगाल), असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. अशोककुमार (वय ३५, रा. कर्नाटक), असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोककुमार आणि पिंटू मंडल हे एकमेकांचे मित्र होते. दारू पिऊन त्यांच्यात भांडण झाली. दारुच्या नशेत असलेल्या मंडलच्या मनात भांडणाचा राग होता. त्यावेळी त्यानं सुरीने अशोककुमारचा गळा चिरून खून केला. त्यानंत मंडल पळून गेला. खुनाचा हा प्रकार गुरुवारी उघडकीस आला. याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तसेच पिंपरी, चिंचवड, देहूगाव, तळेगाव व पुणे स्टेशन या भागात पथके रवाना केली. एक तरुण ससून रुग्णालयाजवळ संशयितरित्या फिरत असल्याची माहिती पोलीस उपिनरीक्षक राहूल कोळी यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी मंडल याला ताब्यात घेतले. त्याने अशोककुमारचा खून केल्याचं पोलिसांना सांगितलं. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद गाेकुळे आणि त्यांच्या पथकानं ही कामगिरी केली.