निगडी प्राधिकरणातील महिलेचा खून; १२ वर्षानंतर आरोपीला जन्मठेप, २७ जणांची साक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 08:58 AM2023-01-10T08:58:25+5:302023-01-10T08:58:40+5:30
आरोपीने घरात घुसून महिलेचा खून करून दोन लाखांचा ऐवज चोरून नेला होता
पिंपरी : घरात घुसून महिलेचा कोयत्याने खून केला. प्राधिकरण निगडी येथे २६ ऑगस्ट २०११ रोजी दुपारी साडेबारा ते पावणेएकच्या दरम्यान ही घटना घडली होती. याप्रकरणी आरोपीला १२ वर्षांनंतर जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.
लक्ष्मण प्रभू वाघ (रा. आकुर्डी, मूळ रा. फुलावरवाडी, ता. पाथरी, जि. परभणी), असे शिक्षा सुनावलेल्याचे नाव आहे. शीतल ओव्हाळ (वय ३२) यांचा खून झाला होता. याप्रकरणी शीतल यांचे पती विनय भाऊसाहेब ओव्हाळ (वय ४२, रा. प्राधिकरण निगडी) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
फिर्यादी विनय ओव्हाळ हे पिंपरी-चिंचवड महापालिकेत अभियंता म्हणून नोकरी करतात. ते २६ ऑगस्ट २०११ रोजी कामावर असताना त्यांची पत्नी शीतल घरी होत्या. त्यावेळी लक्ष्मण वाघ हा ओव्हाळ यांच्या घरी गेला. गार्डनिंगसाठी मला साहेबांनी पाठविले आहे, असे आरोपीने शीतल यांना सांगितले. घरात घुसून कोयत्याने वार करून शीतल यांचा खून केला. त्यानंतर सोन्याचे दागिने व मोबाईल असा दोन लाख १४ हजारांचा ऐवज जबरी चोरी करून आरोपी पळून गेला. याप्रकरणी तत्कालीन पोलीस निरीक्षक राम जाधव यांनी तपास सुरू केला. लक्ष्मण वाघ हा ओव्हाळ यांच्या घरासमोर विनाकारण बसत होता, अशी माहिती मिळाली. प्राधिकरणातील एका बंगल्यात बागकामासाठी लक्ष्मण वाघ रहात असल्याचे समोर आले. मात्र, बंगल्यात तो मिळून आला नाही. त्यामुळे त्याच्या मूळ गावी जाऊन पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. शीतल यांचा खून केल्याची कबुली त्याने दिली. त्यामुळे १९ सप्टेंबर २०११ रोजी लक्ष्मण वाघ याला अटक केली. चोरलेले सोन्याचे दागिने व मोबाईल आरोपीकडून हस्तगत केले. वडगाव मावळ न्यायालयात याप्रकरणी ९ जानेवारी २०२३ रोजी सुनावणी होऊन लक्ष्मण वाघ याला जन्मठेपेची शिक्षा व पाच हजार रुपये दंड, पुरावा नष्ट करेण या गुन्ह्यासाठी तीन महिने साधा कारावास आणि जबरी चोरीच्या गुन्ह्यासाठी सात वर्षे सक्षम कारावास व तीन हजार रुपये दंड, अशी शिक्षा सुनावली.
२७ जणांची साक्ष
सरकारी वकील लीना पाठक यांनी २७ जणांची साक्ष घेतली. सरकारची बाजू भक्कमपणे मांडली. यात पोलिसांनी केलेला तपास देखील महत्त्वपूर्ण ठरला. पिंपरी-चिंचवडचे सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्त राम जाधव, पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव, सहायक फौजदार किरण आरुटे, पोलीस कर्मचारी सतीश कुदळे, दादा जगताप यांनी तपास केला.