महापालिका अधिकारी नेमणुकीत नागपूर पॅटर्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2018 02:54 AM2018-06-03T02:54:01+5:302018-06-03T02:54:01+5:30
महापालिकेत अधिकाऱ्यांमध्ये नागपूर पॅटर्न प्रबळ होत आहे. मुख्य लेखापरीक्षकपदी नागपूर कोशागार कार्यालयातील वरिष्ठ कोशागार अधिकारी आमोद अप्पाजी कुंभोजकर यांची नियुक्ती केली आहे.
पिंपरी : महापालिकेत अधिकाऱ्यांमध्ये नागपूर पॅटर्न प्रबळ होत आहे. मुख्य लेखापरीक्षकपदी नागपूर कोशागार कार्यालयातील वरिष्ठ कोशागार अधिकारी आमोद अप्पाजी कुंभोजकर यांची नियुक्ती केली आहे. वित्त विभागाच्या सहसचिव शुभांगी सेठ यांनी या बदलीचे आदेश दिले आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्य लेखापरीक्षक पद्मश्री तळदेकर यांची पुण्यातील प्राथमिक शिक्षण संचालनालयात नव्याने स्थापन केलेल्या शालेय पोषण आहार विभागात उपसंचालकपदी नियुक्ती झाल्याचा आदेश राज्य सरकारच्या अर्थ विभागाचे अवर सचिव मा. रा. गांधी यांनी काढला होता. त्यानंतर महापालिकेतील हे पद पंधरा दिवसांपर्यंत रिक्त होते.
तळदेकर या पिंपरी-चिंचवड महापालिकेत २०१४ मध्ये प्रतिनियुक्तीवर रुजू झाल्या होत्या. पालिकेत त्यांना साडेतीन वर्षे पूर्ण झाली होती. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून त्यांच्या बदलीची जोरदार चर्चा होती. त्यांच्या जागी कुंभोजकर यांची वर्णी लागली आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर यांचीही बदली नागपूरहून पिंपरी-चिंचवडमध्ये झाली होती. त्यामुळे अधिकाºयांचा नागपूर पॅटर्न तर नाही ना अशी चर्चा महापालिकेत आहे.