नाशिक फाटा चौक ‘सिग्नल फ्री’ कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 03:35 AM2018-05-06T03:35:13+5:302018-05-06T03:35:13+5:30
कासारवाडी येथे उभारण्यात आलेल्या दुमजली उड्डाणपुलामुळे नाशिक फाटा चौकातील वाहतूककोंडी सुटून सिग्नल फ्री होईल, असा दावा केला जात होता. मात्र, गेल्या काही वर्षांपासून हा प्रकल्प रखडला होता. दरम्यान दुमजली उड्डाणपुलाला कासारवाडी व रेल्वे स्टेशन येथे नव्याने रॅम्प उभारण्यात आले आहेत.
पिंपरी - कासारवाडी येथे उभारण्यात आलेल्या दुमजली उड्डाणपुलामुळे नाशिक फाटा चौकातील वाहतूककोंडी सुटून सिग्नल फ्री होईल, असा दावा केला जात होता. मात्र, गेल्या काही वर्षांपासून हा प्रकल्प रखडला होता. दरम्यान दुमजली उड्डाणपुलाला कासारवाडी व रेल्वे स्टेशन येथे नव्याने रॅम्प उभारण्यात आले आहेत. लवकरच हे रॅम्प वाहतुकीसाठी खुले होणार असल्याने आतातरी नाशिक फाटा चौक सिग्नल फ्री होणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
वाहतूककोंडी सोडविण्यासाठी नाशिक फाटा येथे कोट्यवधी रुपये खर्च करून भारतरत्न जे. आर. डी. टाटा दुमजली उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. यामुळे वाहतूक सुरळीत होण्यास मोठी मदत झाली आहे. कासारवाडीहून भोसरीच्या दिशेला, भोसरीहून थेट पिंपळे गुरवला जाण्यासाठी तसेच पिंपळे गुरवहून भोसरीला जाण्यासाठी या पुलाचा उपयोग होत आहे. रेल्वे ट्रॅकसह नदी ओलांडून जाणारा हा एकमेव पूल आहे.
दरम्यान, कासारवाडीहून पिंपळे गुरवकडे जाण्यासाठी रॅम्प उभारण्यात आला असून, हा रॅम्प पहिल्या मजल्याच्या पुलाला जोडतो. अशाच प्रकारे पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, वाकड, जगताप डेअरी येथून जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर वल्लभनगर येथे येण्यासाठी रॅम्प बांधणीचे काम हाती घेण्यात आले. त्यामुळे थेट महामार्गावर येणे शक्य होणार आहे. या रॅम्पचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे नाशिक फाटा चौकातील वाहतूक सुरळित होऊन हा सिग्नल फ्री मार्ग होण्याची नागरिकांना आशा आहे.
मेट्रो कामाचा अडथळा
सध्या पिंपरीपर्यंत मेट्रोचे काम सुरू असून यासाठी ग्रेड सेपरेटरमध्ये पीलर उभारले जात आहेत. यामुळे ग्रेड सेपरेटरमधील वाहतूक बंद ठेवली जात असल्याने सेवा रस्त्यावरील वाहतुकीवर ताण येतो. सेवारस्त्याने पिंपरीहून नाशिक फाटा चौकात येणारी वाहने येथील अरुंद मार्गात अडकतात. अशावेळी सिग्नलमुळे वाहने मर्यादित वेगात धावतात. त्यामुळे मेट्रोच्या कामानुसार हा चौक सिग्नल फ्री करण्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
रॅम्प लवकरच खुला
पिंपळे गुरवहून वल्लभनगरला येण्यासाठी बांधण्यात आलेला रॅम्प २९५ मीटर लांबीचा असून लवकरच हा रॅम्प वाहतुकीसाठी खुला होणार आहे. पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, वाकड या
भागातून वल्लभनगरच्या दिशेने येणाऱ्या वाहनांची संख्याही अधिक आहे. वल्लभनगर येथे एसटी स्थानक असल्याने प्रवाशांसाठी हा रॅम्प सोयीचा ठरणार आहे.
वाहनांची संख्या अधिक
हा पूल जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर असून या महामार्गावर धावणाºया वाहनांची संख्याही अधिक आहे. दरम्यान, या पुलामुळे हा मार्ग सिग्नल फ्री होईल, असा दावा केला जात होता. मात्र, अद्यापही येथे सिग्नल कायम असून वाहनचालकांना सिग्नल सुटण्याची वाट पाहत थांबावे लागत आहे. या पुलाच्या सर्व रॅम्पचे काम पूर्ण करुन ते खुले करण्यात यावेत, अशी मागणी होत आहे.