राष्ट्रवादी, भाजपाची चमकोगिरी

By admin | Published: December 24, 2016 12:35 AM2016-12-24T00:35:41+5:302016-12-24T00:35:41+5:30

जनतेच्या पैशांवर भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसची चमकोगिरी सुरू आहे. महापालिकेचा निधी वापरून त्यावर

NCP, BJP's brightness | राष्ट्रवादी, भाजपाची चमकोगिरी

राष्ट्रवादी, भाजपाची चमकोगिरी

Next

पिंपरी : जनतेच्या पैशांवर भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसची चमकोगिरी सुरू आहे. महापालिकेचा निधी वापरून त्यावर विविध विकास प्रकल्पांचे श्रेय घेण्याचे काम महापालिकेतील राष्ट्रवादीचे सत्ताधारी नगरसेवक करीत आहेत. तर केंद्र व राज्य शासनाच्या मुंबईतील शिवस्मारक भूमीपूजन कार्यक्रमाच्या निमित्ताने शहरातील नद्यांचे जल आणि मृदा एकत्रित करून त्याची मिरवणूक काढण्यात येत आहे. अशाप्रकारची राष्ट्रवादी आणि भाजपाची चमकोगिरी चर्चेचा विषय ठरली आहे.
महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागत असल्याने विविध विकास कामांचा धडाका लागला आहे. विकासकामांचे श्रेय सत्ताधारी पक्ष घेत आहेत. बुधवारी दिवसभर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार पिंपरीत तळ ठोकून होते. त्यांनी सुमारे १८ प्रकल्पांचे भूमिपूजन, उद्घाटन उरकून घेतले. त्यात विविध उड्डाणपूल, उद्याने, रस्ते, तरणतलाव, क्रीडांगणे यांचा समावेश आहे. कासारवाडी, अण्णासाहेब मगर स्टेडिअम, मासुळकर कॉलनी, चिंचवड स्टेशन, आकुर्डी, रहाटणी-पिंपळे सौदागर, सांगवी गावठाण, ढोरे नगर, आनंदनगर, गवळीनगर, चऱ्होली, मोशी, शाहूनगरला कामांचा धडाका लावण्यात आला होता. महापालिकेच्या खर्चाने नगरसेवकांनी आपल्या प्रभागात भूमीपूजन व उद्घाटनांचे कार्यक्रम घेऊन स्वत:चा व पक्षाचा प्रचार करून घेतला.
दुसरीकडे शनिवारी मुंबईत शिवस्मारकाचे उद्घाटन होणार आहे. राज्य शासनाच्या कार्यक्रमांचे श्रेय भारतीय जनता पक्ष घेत आहे. त्यासाठी पुणे जिल्ह्यातील भाजपातील प्रमुखांना आपापल्या परिसरातील नद्या, माती एकत्रित करण्यास सांगितले आहे. त्यामुळे भाजपाचे नेते आणि कार्यकर्ते शिवस्मारकाचे श्रेय घेण्यासाठी धडपडत आहेत. पालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून राष्ट्रवादी व भाजपाच्या नेत्यांमध्ये श्रेयासाठी चढाओढ लागली आहे.(प्रतिनिधी)

Web Title: NCP, BJP's brightness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.