पिंपरी : कार्यकाल पूर्ण झाल्याने महापालिकेचे विरोधीपक्षनेते दत्ता साने यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे विरोधीपक्षनेतेपदी नाना काटे यांची वर्णी लागणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांद्वार समजते. यावर गुरुवारी होणाऱ्या बैठकीत शिक्कामोर्तब होणार आहे.पिंपरी-चिंचवड महापालिकेत दरवर्षी नवीन सदस्यांना विरोधीपक्षनेतेपदी संधी देण्याचे धोरण राष्ट्रवादी काँग्रेसने अवलंबिले होते. त्यानुसार पहिल्या वर्षी माजी महापौर योगेश बहल, त्यानंतर दुसºया वर्षी दत्ता साने यांना संधी दिली होती. साने यांचा एक वषार्चा कालखंड संपल्याने इच्छुकांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे साने यांचा राजीनामा घेण्याची मागणी केली होती. त्यानुसार साने यांनी राजीनामा दिला आहे. या पदासाठी माजी महापौर डॉ. वैशाली घोडेकर, नाना काटे, जावेद शेख, मयूर कलाटे यांच्या नावाची चर्चा होती. त्यापैकी कोणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता आहे.विरोधीपक्षनेतेपदी भोसरी, पिंपरी विधानसभेला संधी दिली आहे. त्यामुळे चिंचवडला संधी मिळणार असल्याचे राष्ट्रवादीच्या गोटातून बोलले जाते. मावळ लोकसभेत अपयश आल्यानंतर पार्थ पवार यांनी चिंचवड विधानसभेवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे भाजपाला परखड विरोध करण्यासाठी चिंचवडमधील सदस्याला संधी द्यावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार ज्येष्ठ नगरसेवक नाना काटे यांना संधी मिळणार असल्याचे समजते. गुरुवारी अजित पवार शहराच्या दौऱ्यावर आहेत. त्या वेळी घोषणा होणार असल्याचेही विश्वसनीय वृत्त आहे.
पिंपरी महापालिकेच्या विरोधीपक्षनेतेपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे यांची वर्णी लागण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 1:55 PM
महापालिकेचे विरोधीपक्षनेते दत्ता साने यांनी कार्यकाल पूर्ण झाल्याने राजीनामा दिला आहे.
ठळक मुद्देगुरुवारी होणाऱ्या बैठकीत शिक्कामोर्तब होणार