मतदानाच्या दिवशी महापालिकेने मतदारांना पाजले ३० लाखांचे पाणी..!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2024 01:09 PM2024-12-05T13:09:07+5:302024-12-05T13:28:26+5:30
या बाटल्यांवर ३० लाखांचा खर्च महापालिका तिजोरीतून करण्यात आला.
पिंपरी : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी. महापालिकेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात आले. परंतु, त्याचाच एक भाग म्हणून मतदानाच्या दिवशी महापालिकेने सुमारे पाच लाख पाण्याच्या बाटल्यांचे वाटप केले. या बाटल्यांवर ३० लाखांचा खर्च महापालिका तिजोरीतून करण्यात आला.
राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजना, उपक्रमांवर पालिकेकडून सातत्याने खर्च केला जातो. त्यातच निवडणुकीमध्ये मतदान जगजागृतीसाठीही महापालिकेवर जबाबादारी देण्यात आली. यात मतदार जनजागृतीपेक्षा महापालिकेच्या यंत्रणेने खर्चिक उपक्रमांवरच भर दिल्याचे पाहायला मिळत आहे. महापालिका हद्दीतील पिंपरी, भोसरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात एकूण पाच लाख पाण्याच्या बाटल्यांचे मतदानाच्या दिवशी वाटप करण्यात आले.
तिन्ही विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी १ लाख ६६ हजार ६६६ अडीचशे मिलीलिटरच्या पाणी बॉटल प्रति नग ६ रुपये या दराने खरेदी करण्यात आल्या. त्यावर प्रति मतदारसंघ एकूण ९ लाख ९९ हजार ९९६ रुपये इतका खर्च करण्यात आला. पालिकेच्या मध्यवर्ती भांडार विभागाने कोटेशन पद्धतीने ही खरेदी केली. ही खरेदी मे. शिवसमर्थ एंटरप्रायजेस यांच्याकडून करण्यात आली.
दरम्यान, निवडणुकीत मतदारांना पाणी बाटल्या वाटपाचा हा उपक्रम प्रथमच राबविण्यात आला. त्यातही तब्बल तीस लाख रुपये खर्च त्यावर करण्यात आला आहे. निवडणूक यंत्रणेकडून मतदारांना सोयी-सुविधा पुरविल्या जातात. त्याची नियमावली आहे. परंतु, आचारसंहितेतही महापालिकेने मतदार जनजागृतीच्या नावाखाली खर्चिक कामे काढण्याचा हा प्रकार केल्याची टीका आता होऊ लागली आहे.