पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी-चिंचवड येथील माजी उपमहापौराच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी आरपीआयच्या पिंपरी-चिंचवड शहाराध्यक्षाला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सुरेश निकाळजे असे आरोपीचे नाव आहे. आरोपी निकाळजे हा रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आठवले गट) या पक्षाचा शहराध्यक्ष आहे. पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद वाघमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीचे माजी उपमहापौर डब्बू उर्फ हिरानंद आसवानी यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. आरोपी निकाळजे याने १० मार्च २०२० रोजी तक्रारदार आसवानी यांना फोन करून धमकी दिली होती. तसेच ‘हिसाब करेंगे... हिसाब करेंगे’ असा व्हिडीओ करून ‘टिकटॉक’वर व्हायरल केला होता.
यावरून तक्रारदार आसवानी यांनी तक्रार अर्ज केला. त्यानुसार पोलिसांनी सुरवातीला त्या अर्जावरून अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली होती. त्यानंतर न्यायालयाने याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांनी तपास केला असता, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल करण्यात आल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार अदखलपात्र गुन्ह्यामध्ये कलमवाढ करण्यात आली. तसेच बुधवारी रात्री आरोपी याला अटक केली.