पिंपरी चिंचवड मध्ये दिवसाआड पाणी पुरवठा विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 12:40 PM2019-05-08T12:40:15+5:302019-05-08T12:44:00+5:30
पिंपरी-चिंचवड शहराला मावळातील पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातोे.
पिंपरी : पवना धरणातीलपाणीसाठा कमी झाल्याने महापालिकेने पाणीपुरवठा दिवसाआड करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्याचेही वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. परिणामी नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून, पाणीचोरी आणि गळती यावर उपाययोजना करण्यात महापालिका यंत्रणा अपयशी ठरत आहे.
पिंपरी-चिंचवड शहराला मावळातील पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातोे. धरणातून नदीत आणि रावेत येथील बंधाऱ्यांतून जलउपसा केंद्रातून पाणी शहरात पुरविले जाते. दिवसाला ४८० एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. धरणातील पाणीसाठा ३० टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारपासून दिवसाआड पाणीपुरवठा झाला असला, तरी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केलेले नियोजन विस्कळीत झाले आहे.
..............
४० टक्के पाणीगळतीकडे दुर्लक्ष
पाणीकपात करीत असताना पाणीगळती आणि चोरीकडे महापालिका पाणीपुरवठा विभागाचे दुर्लक्ष होत आहे. महापालिका पाणीपुरवठा विभागापुढे चोरी आणि गळतीचे मोठे आव्हान आहे. शहरात पाणी गळतीचे प्रमाण चाळीस टक्के आहे. काही महिन्यांपूर्वी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पाणी गळतीवर नियंत्रण आणू असा दावा केला होता. मात्र, हा दावा फोल ठरला आहे. पाणी गळतीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. शहरातील विविध भागात पाणी गळतीचे प्रमाण वाढले आहे. विठ्ठलनगर लांडेवाडी भोसरीत परिसरात पाण्याची गळती होत आहे. तसेच एमआयडीसी टेल्को रोड येथील व्हॉल्व्हवरून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. तसेच काळाखडक, वाकड येथे महापालिकेच्या वाहिनीला पाइप जोडून पाण्याची चोरी केली जात आहे. थेरगाव बिर्ला हॉस्पिटलजवळील व्हॉल्व्हमधून पाण्याची गळती होत आहे. आकुर्डी रेल्वेस्टेशन परिसरातही पाणी गळतीचे प्रमाण अधिक आहे.
.............
झोपडपट्टी भागात अनधिकृत नडजोळाद्वारे पाणी चोरी
१ महापालिका क्षेत्रात विविध भागात पाणी चोरीचे प्रमाण अधिक आहे. तसेच झोपडपट्टीच्या परिसरातील नळजोड हे विनापरवना घेतले आहेत. ते नियमितीकरणासाठी महापालिकेकडून विशेष उपाययोजना केल्या जात नसल्याचे दिसून येत आहे. महापालिकेच्या जलवाहिन्यांना टॅप मारून पाणी चोरी केली जात आहे.
२ झोपडपट्ट्यांतील पाणीचोरीकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे. महापालिकेच्या वतीने अभय योजना राबविण्यात आली. त्यात सुमारे सहा हजार नळजोडांची नोंदणी अधिकृत करण्यात आली. मात्र, झोपडपट्ट्यांमधील अनधिकृत नळजोड अधिकृत करण्यास प्रतिसाद मिळाला नसल्याचे महापालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
.....