पिंपरी : श्री काळभैरवनाथ उत्सव समितीच्या वतीने चिंचवडमध्ये ‘एक गाव, एक शिवजयंती’ उत्सवाचे आयोजन केले आहे. या अंतर्गत चार मार्चला मिरवणूक काढण्यात येणार असून त्यात तानाजी मालुसरे, येसाजी कंक, खंडेराव दाभाडे, व्यंकोजी शिरोळे यांचे वंशज सहभागी होणार आहेत. श्री काळभैरवनाथ उत्सव समितीच्या वतीने मागील तीन वर्षांपासून अखिल चिंचवडगाव शिवजयंती महोत्सव आयोजित करण्यात येतो. यावेळीही विविध कार्यक्रम होणार आहेत. शिव व्याख्यानमाला तीन मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. व्याख्यानमालेचे पहिले पुष्प निलेश गावडे यांनी गड किल्ले महाराष्ट्राचे या विषयाने तर दुसरे पुष्प श्रीहरी तापकीर यांनी दक्षिणस्वारी या विषयाने गुंफले. मंगळवारी पागेची तालीम येथे मयार्देय विराजते याविषयावर श्रीनिवास कचरे, बुधवारी काकडे पार्क चौक येथे राहुल कराळे यांचे ऐसा राजा होणे नाही', गुरुवारी दळवीनगर चौकात भूषण शिंदे यांचे पराक्रमी मराठे, शुक्रवारी वाल्हेकरवाडी चौकात प्रशांत लवटे यांचे पराक्रमापलिकडील शिवराय या विषयावर व्याख्यान होईल. तर शुक्रवारी चापेकर चौकात मालोजी जगदाळे यांच्या छत्रपती थोरले शाहू या विषयावरील व्याख्यानाने समारोप होईल. दररोज सायंकाळी सात वाजता ही व्याख्याने होणार आहेत.
चार मार्चला श्री काळभैरवनाथ मंदिर येथे दुपारी बारा वाजता शिवछत्रपतींचा जन्मोत्सव साजरा करण्यात येईल. याच दिवशी दुपारी चार वाजता श्री शिवछत्रपतींचा पालखी सोहळा काढण्यात येईल. चौदा फुट उंचीच्या सिंहासनावर आरुढ शिवरायांच्या मूतीर्ची मिरवणूक काढण्यात येईल. पारंपरिक वाद्य, मदार्नी खेळ, घोडे, वारकरी पथक, बैलगाडा, पालखी, पोतराज, हलगी वादन, ढोल-ताशा पथक असा लवाजमा या मिरवणुकीत सामावलेला असेल. विशेष म्हणजे शिवरायांच्या घोडदळातील प्रमुख सरदार असलेले तानाजी मालुसरे, येसाजी कंक, खंडेराव दाभाडे, व्यंकोजी शिरोळे यांचे वंशज यामध्ये सहभागी होणार आहेत.
रांगोळीतून साकारतेय मोडी लिपी मराठी भाषा दिनानिमित्त देऊळमळा पटांगणामध्ये छत्रपती शिवरायांची प्रतिमा असलेली पाच हजारपेक्षा जास्त जय शिवराय मोडी लिपीत या शब्दाचा वापर करून श्रुती गणेश गावडे या रांगोळी साकारत असून चाळीस बाय चाळीस फूट आकारात ही रांगोळी काढण्यात येणार आहे. मराठी भाषेच्या लेखनाची प्रमुख लिपी होती. मोडी लिपीचे संवर्धन व्हावे याकडे लक्ष वेधण्यासाठी ही रांगोळी काढण्यात येत असल्याचे काळभैरवनाथ उत्सव समितीच्या वतीने सांगितले आहे.