ओपन जीमचे आरोग्य धोक्यात; महापालिकेचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 02:50 AM2018-12-15T02:50:25+5:302018-12-15T02:50:47+5:30
टवाळखोरांकडून साहित्याची मोडतोड; दुरुस्तीची स्थानिक नागरिकांकडून मागणी
सांगवी : महापालिकेच्या जुन्या सांगवीतील छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानातील ओपन जीमच्या साहित्याची टवाळखोरांनी मोडतोड केली आहे. साहित्य वापराविना पडून आहे. महापालिका प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने या साहित्याची अधिकच दुरवस्था होत आहे. त्यामुळे नागरिकांसाठी राबविण्यात आलेल्या या ओपन जीम उपक्रमाच्या हेतूला हरताळ फासला जात आहे.
आरोग्य उत्तम राहावे म्हणून नागरिक हिवाळ्यात व्यायामावर भर देतात. व्यायामासाठीचे साहित्य सहज उपलब्ध व्हावे म्हणून ‘ओपन जीम’ ही संकल्पना उदयास आली. त्यानुसार महापालिकेने शहरातील काही भागात उद्यानांमध्ये ‘ओपन जीम’ सुरू केली. मात्र त्यानंतर या जीममधील साहित्याची दुरुस्ती आणि देखभाल याकडे महापालिकेकडून दुर्लक्ष करण्यात आले. परिणामी जीममधील साहित्याची मोडतोड होऊन दुरवस्था झाली. त्यामुळे ‘ओपन जीम’चेच आरोग्य धोक्यात आल्याचे दिसून येत आहे. महापालिका प्रशासनाने याबाबत उपाययोजना करून साहित्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांतून होत आहे.
सांगवी परिसरात महापालिकेची चार उद्याने आहेत. यातील एक पिंपळे गुरव येथील राजमाता जिजाऊ उद्यान सध्या काही महिन्यांपासून विकसित करण्यासाठी बंद असून, इतर तीन उद्यानांमधील सर्वांत मोठे मधुबन सोसायटी येथील छत्रपती शिवाजीमहाराज उद्यान अनेक कारणांनी प्रसिद्ध असून, येथील फुलांची व इतर अनेक प्रकारची झाडे सुंदर असून वेगळ्या पद्धतीने हे उद्यान नागरिकांचे विरंगुळा व आकर्षणाचे ठिकाण आहे. येथील विविध प्रकारच्या सुविधा व स्वच्छता खास असून लहान मुले व जेष्ठ नागरिक व परिसरातील नागरिकांची येथे गर्दी दिसून येते.
या उद्यनाच्या डाव्या बाजूला सकाळी व संध्याकाळी येणाऱ्या परिसरातील नागरिकांसाठी महापालिकेकडून ओपन जीमसाठी लागणारी साधने उपलब्ध करून दिली. मात्र या साहित्याची टवाळखोरांकडून मोडतोड करण्यात येत आहे.
मुळातच साहित्य कमी असताना आहे त्याची मोडतोड होत आहे. फोम शीट लोखंडी बारवरून गायब झाल्याचे दिसून येते. लोखंडी रॉड उघडे पडले असून, दुसºया साहित्याची पूर्ण व्यायाम करण्यासाठी लागणारी प्रक्रिया बंद असून त्याचे पेडल व हँडल तुटले असल्याचे ‘लोकमत पाहणी’तून दिसून आले.
ओपन जीममध्ये केवळ चार साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहेत. परिसरातील लोकसंख्या बघता साहित्य कमी असल्याचे दिसून येते. महापालिका कर्मचाºयांची नजर चुकवून टवाळखोर या साहित्याची मोडतोड करतात. टवाळखोरांना हटकण्याचा प्रयत्न केला तर ते गुंडगिरीची भाषा करतात. त्यामुळे त्यांना कोणीही बोलत नाही, असे स्थानिकांनी सांगितले. यासाठी कायमस्वरूपी सुरक्षारक्षक नियुक्त करण्यात यावा, अशी नागरिकांची मागणी आहे.
ओपन जीममध्ये व्यायामासाठी चार प्रकारचे साहित्य
व्यायामासाठी उद्यानात येणाºयांच्या तुलनेत साहित्य कमी
उद्यानासाठी केवळ एक उद्यान निरीक्षक, एक कर्मचारी व एक माळी
कायमस्वरूपी सुरक्षारक्षक नियुक्त करण्याची मागणी
दुपारी उद्यान बंद असताना कोणासही प्रवेश देऊ नये
नोटीस व सूचनाफलकाची मागणी
साहित्याची महिन्यातून दोनदा पाहणी व दुरुस्ती व्हावी
जीममधील साहित्य संख्या वाढवण्यात यावी
ओपन जीममधील तुटलेल्या साहित्याची पाहणी करून अहवाल क्रीडा विभागाकडे दिला आहे. त्या संदर्भात वरिष्ठ अधिकारी व महापालिकेकडून लवकरच याबाबत दखल घेण्यात येईल.
- जे. व्ही. पटेल,
उद्यान निरीक्षक, महापालिका
येथे व्यायामासाठी केवळ चार प्रकारचे साहित्य आहे. त्या तुलनेत व्यायामासाठी येथे येणाºया नागरिकांची संख्या जास्त आहे. परिणामी व्यायामासाठी प्रतीक्षा करावी लागते. त्यात वेळेचा अपव्यय होतो. टवाळखोर मुले साहित्याची मोडतोड करतात.
- राजेंद्र कोकाटे,
रहिवासी, सांगवी