विरोधी पक्षनेते साने की काटे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 03:36 AM2018-05-06T03:36:57+5:302018-05-06T03:36:57+5:30
महापालिकेतील विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी शनिवारी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा महापौर नितीन काळजे यांच्याकडे सोपविला. सत्ताधारी भाजपाविरोधात आक़्रमक भूमिका बजावू शकेल, अशा व्यक्तीला राष्टÑवादी काँग्रेसतर्फे विरोधी पक्षनेते पदी संधी दिली जाणार आहे. या पदासाठी ज्येष्ठ नगरसेवक दत्ता साने व विठ्ठल ऊर्फ नाना काटे यांची नावे चर्चेत आहेत.
पिंपरी : महापालिकेतील विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी शनिवारी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा महापौर नितीन काळजे यांच्याकडे सोपविला. सत्ताधारी भाजपाविरोधात आक़्रमक भूमिका बजावू शकेल, अशा व्यक्तीला राष्टÑवादी काँग्रेसतर्फे विरोधी पक्षनेते पदी संधी दिली जाणार आहे. या पदासाठी ज्येष्ठ नगरसेवक दत्ता साने व विठ्ठल ऊर्फ नाना काटे यांची नावे चर्चेत आहेत.
महापालिकेत १५ वर्षे सत्तेत राहिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा फेब्रुवारी २०१७ च्या निवडणुकीत पराभव झाला. १२८ पैकी राष्टÑवादी काँग्रेसचे केवळ ३६ नगरसेवक निवडून आले. भाजपाने महापालिकेची सत्ता काबीज केली. राष्टÑवादी काँग्रेसला विरोधी बाकावर बसण्याची वेळ आली. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी महापौर योगेश बहल यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपदाची धुरा सोपविली. परंतु, बहल सत्ताधाऱ्यांविरुद्ध आवाज उठविण्यात कमी पडले, अशा तक्रारी पक्षातील काहीजण नेत्याकडे करू लागले. सत्ताधारी भाजपाच्या नेत्यांशी बहल यांची सलगी आहे, असेही आरोप झाले होते. त्यानंतर फेब्रुवारी २०१८ पासून विरोधी पक्षनेता बदलाच्या हालचालींना वेग आला होता.
विरोधी पक्षनेतेपदी पाच वर्षांत पाच जणांना संधी देण्याचे धोरण नेत्यांनी आखले आहे. माझा एक वर्षाचा कालखंड मार्चमध्ये पूर्ण झाला आहे. इतरांना संधी मिळावी, या उद्देशाने राजीनामा दिला आहे. या पदावर चांगले काम करेन, असा विश्वास दाखवून पक्षाने काम करण्याची संधी दिली, त्यानुसार या पदाची जबाबदारी पेलली आहे. कोणीही राजीनाम्यासाठी तगादा लावला नव्हता, स्वत:हून राजीनामा दिला आहे. - योगेश बहल
विरोधी पक्षनेते पदासाठी माजी महापौर मंगला कदम, स्थायी समितीचे माजी सभापती अजित गव्हाणे, नगरसेवक दत्ता साने व नाना काटे यांच्या नावे चर्चेत आली. अलीकडे माजी उपमहापौर राजू मिसाळ, माजी महापौर वैशाली घोडेकर व जावेद शेख यांनीही विरोधी पक्षनेतेपदावर काम करण्यास इच्छुक असल्याचे मत नेत्यांकडे व्यक्त केले आहे. सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडणारा, चुकीच्या कामाला प्रखर विरोध करणाºया अभ्यासू नगरसेवकाकडे विरोधी पक्षनेतेपदाची धुरा सोपविली जावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.