पिंपरी: पेंटींगच्या मजुरीचे पैसे दिले नाहीत म्हणून सेवानिवृत्ताचा खून केल्याचे उघडकीस आले आहे. नेवाळे वस्ती, चिखली येथे २१ सप्टेंबरला खुनाचा हा प्रकार समोर आला होता. चिखली पोलिसांनी या गुन्ह्याची उकल केली असून आरोपी पेंटरला छत्तीसगड येथून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. दिनेश संतोष साहू (वय १९, रा. अवसपारा गुनियारी, ता. तकतपुर, जि. बिलासपूर, छत्तीसगड), असे अटक केलेल्या आरोपी पेंटरचे नाव आहे. वीरेंद्र वसंत उमरगी (वय ४०, रा. नेवाळे वस्ती, चिखली, मूळ रा. विजापूर), असे खून झालेल्या सेवानिवृत्त व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वीरेंद्र उमरगी ओम लॉजीस्टिक कंपनीत काम करत होते. तिथून निवृत्त झाले होते. निवृत्तीनंतर त्यांना ग्रॅच्युटीचे पैसे मिळाले होते. वीरेंद्र यांचे पत्नीशी भांडण झाले होते. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून ते विभक्त राहत होते. वीरेंद्र यांना दारूचे व्यसन होते. दोन दिवसांपासून त्यांचे घर बंद होते. त्यांच्या मित्राने फोन केला पण वीरेंद्र यांनी उचलला नाही. त्यामुळे मित्राने येऊन बघितले असता वीरेंद्र यांचा मृतदेह आढळला.
Subsidy Fraud: अनुदान मिळवून देण्याचे सांगून दोन शेतकऱ्यांना दोन लाख ८६ हजारांचा गंडा
खुनाच्या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी उमरगी यांच्या इमारतीमध्ये पेंटिंगच्या कामासाठी आलेल्या कामगारांची चौकशी केली. त्यात एका कामगाराचा फोन गुन्हा घडल्यानंतर बंद होता. त्यामुळे त्याच्यावर संशय बळावला. पोलिसांनी छत्तीसगड येथून आरोपी दिनेश साहू याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याच्या एका मित्रासोबत मिळून हा खून केल्याचे सांगितले.
चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने, तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विवेक कुमटकर, सहाय्यक फौजदार आनंद चव्हाण, पोलीस कर्मचारी सुनील शिंदे, चेतन सावत, बाबा गर्जे, विश्वास नाणेकर, चंद्रशेखर चोरघे, विपुल होले, गणेश टिळेकर, कबीर पिंजारी, नूतन कोडे, संतोष सपकाळ यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
दिल्लीला पळून जाताना घेतले ताब्यात-आरोपी पेंटर दिनेश साहू हा छत्तीसगड येथून दिल्लीला पळून जाण्याच्या तयारीत होता. याबाबत पोलिसांना माहिती मिळाली. आरोपी साहू हा एकाच ठिकाणी न थांबता वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्य करीत असल्याचे समोर आले. तो मंगला चौक, बिलासपूर येथे त्याच्या मित्राकडे असताना पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. दिनेश हा मयत उमरगी यांच्याकडे पेंटिंगचे काम करत होता. उमरगी यांनी त्याला त्याच्या पेंटींगच्या कामाच्या मजुरीचे पैसे दिले नाहीत. त्याकारणावरून आरोपी साहू याने उमरगी यांचा खून केला. पोलिसांनी चौकशी केली असता आरोपी साहू याने हा गुन्हा केल्याचे पोलिसांना सांगितले.