संततधारेमुळे पन्नास टक्के पवना धरण भरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 01:46 PM2018-07-13T13:46:45+5:302018-07-13T13:50:48+5:30

आठवडाभरापासून मावळ परिसरात पावसाचा जोर कायम आहे. मागील चोवीस तासात पवना धरण परिसरात दीडशे मिमी तर लोणावळा शहरात ऐंशी मिमी पावसाची नोंद झाली आहे.

pawna dam fifty percent full due to rain | संततधारेमुळे पन्नास टक्के पवना धरण भरले

संततधारेमुळे पन्नास टक्के पवना धरण भरले

Next
ठळक मुद्दे पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास पुढील काही दिवसात मावळातील धरणे तुडुंब भरण्याची शक्यतालोणावळ्यात मागील वर्षीची पावसाने सरासरी ओलांडली

पिंपरी : उद्योगनगरीसह मावळ परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न संपला आहे. पिंपरी चिंचवड शहराची जीवनदायिनी असणाऱ्या मावळ तालुक्यातील पवना धरण पन्नास टक्के भरले आहे. त्यामुळे उद्योगनगरीचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्पुरत्या स्वरुपात तरी मिटला आहे.
मान्सूनचे शहरात जोरदार आगमन झाले होते. त्यानंतर पंधरा दिवस पावसाने दडी मारली होती. मात्र, दहा दिवसांपासून पावसाचा जोर सरू आहे. आठवडाभरापासून मावळ परिसरात पावसाचा जोर कायम आहे. मागील चोवीस तासात पवना धरण परिसरात दीडशे मिमी तर लोणावळा शहरात ऐंशी मिमी पावसाची नोंद झाली आहे. पावसाच्या संततधारेमुळे मावळ आणि मुळशी परिसरातील इंद्रायणी व पवना आणि मुळा या नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. मागील आठवड्यात सांगिसे पूल पाण्याखाली जाण्याची घटना व जलपर्णीमुळे इंद्रायणीला वाकसई भागात पूर आल्याच्या घटना घडल्या होत्या. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास पुढील काही दिवसात मावळातील धरणे तुडुंब भरण्याची शक्यता आहे. पावसासोबत वारा असल्याने लोणावळा व परिसरासह मावळात अनेक ठिकाणी विजेचा लपंडाव सुरु आहे. रावेत, किवळे भागातही पावसामुळे वीजेचा लंपडाव सुरू आहे.
लोणावळ्यात सरासरी ओलांडली
जून महिना संपला तरी सुरु न झालेला मान्सून जुलै महिन्यात लोणावळ्यात चांगलाच सक्रिय झाल्याने अवघ्या पंधरा दिवसात पावसाने मागील वर्षीची सरासरी गाठली आहे. लोणावळा शहरात आज अखेर १८१० मिमी पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षी आज अखेर हा आकडा १७६५ मिमी होता.
धरण साठ्यात झाली वाढ
मावळ आणि मुळशीतील धरणे भरू लागली आहेत. १ जूनपर्यंत साठा २४.४ टक्के असणारे पवना धरण पन्नास टक्के भरले आहे. मावळातील वाडिवळे धरणात ७४ टक्के, आंद्रा धरणात ७० टक्के, कासारसाई धरणात ५९ टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे सहा दिवसात मोठ्याप्रमाणावर पाऊस झाल्याने मावळ मुळशी आणि पिंपरी-चिंचवडचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. पावसाचा जोर कायम असल्यामुळे पूरनियंत्रणाची तयारीही महापालिकेने केली आहे. 
.................................................................................
अशी वाढली पाण्याची पातळी
...............................................................................
दिनांक             पाऊस ( मिमी )     एकुण पाऊस  ( मिमी )        टक्केवारी 
१)  ७ जुलै          १३२                     ७२.९                                           ३१ 
२) १० जुलै        ६४                       ८८.३                                             ३९
३)११ जुलै          ८५                     ९६.५                                            ४३
४) १२ जुलै        १४.८                    ११०८                                              ४६
५) १३ जुलै        १४९                      १२०६                                             ४९.९०
...............................................................

Web Title: pawna dam fifty percent full due to rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.