पिंपरी - चिखली येथे होणाऱ्या संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराममहाराज संतपीठाच्या कामात रिंग झाल्याचा आरोप करून विरोधी पक्षाने सर्वसाधारण सभेत गोंधळ घातला. मानदंड पळविण्याचा प्रयत्न केला. सत्ताधारी भाजपाने या गोंधळाचा फायदा घेऊन चिखलीतील संतपीठ, भोसरीतील रुग्णालयाचे खासगीकरण असे महत्त्वाचे विषय रेटून नेले. दोन्ही सभांचे कामकाज केवळ अर्ध्या तासात आटोपण्यात आले.पिंपरी-चिंचवड महापालिकेची जानेवारी महिन्यात तहकूब सर्वसाधारण सभा सोमवारी दुपारी सुरू झाली. अध्यक्षस्थानी महापौर राहुल जाधव होते. चिखलीत उभारण्यात येणाºया संतपीठासाठी खासगी कंपनी स्थापन करणे, तसेच भोसरीतील रुग्णालयाचे खासगीकरण करणे, बसखरेदी, क्रीडा धोरणांतर्गत लॉन टेनिस कोर्ट नंदन बाळ यांना चालविण्यास देणे आदी प्रस्ताव विषयपत्रिकेवर होते. सभा सुरू होण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या नेतृत्वाखाली महापौरांच्या आसनासमोर आंदोलन केले. संतपीठ आणि रुग्णालय खासगीकरणावर टीका करणारी वेशभूषा केली होती.त्या वेळी विरोधी पक्षनेत्यांनी रिंगविषयी संभाषणाचा आॅडिओ पुरावा सादर करण्याचा प्रयत्न केला. त्यास महापौरांनी विरोध केला. यावरून सत्ताधारी, विरोधक नगरसेवकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. चºहोलीतील रस्ते कामांचाही रिंगच्या आरोपात समावेश असल्याने माजी महापौर नितीन काळजे संतप्त झाले. त्यांनी दत्ता साने यांचे बोलणे रोखत केवळ संतपीठावर बोला, असे सांगितले. त्यानंतर साने आणि राष्ट्रवादी नगरसेवकांनी पुन्हा एकदा महापौरांच्या आसनासमोर धाव घेतली. राजदंड हिसकाविण्याचाही प्रयत्न केला. हुज्जत घालायचे सुरू असतानाच महापौरांनी अचानक संतपीठाच्या विषयासह पीएमपीएमएलला बसगाड्या खरेदी करण्यासाठी अर्थसाह्य करण्याचा विषयही मंजूर केल्याचे जाहीर केले. तसेच, सभा कामकाज एक तासासाठी तहकूब केले.दुसºया सभेत राष्ट्रवादी नगरसेवकांनी भोसरी रुग्णालयाच्या खासगीकरणावर चर्चा करणे अपेक्षित असतानाच सभा कामकाज सुरू झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांनी गोंधळ घातला. या गोंधळाचा फायदा घेत महापौरांनी तीन मिनिटांत सर्व विषय मंजूर करून सभा कामकाज संपविले.महापालिकेच्या सभागृहात बोलण्यास कोणासही मज्जाव केला जात नाही. सर्व सदस्यांना संधी देण्याचा प्रयत्न असतो. विषय सुरू झाल्यावर चर्चा करा, मते मांडा, असे सदस्यांना मी वारंवार सांगत होतो. मात्र, विरोधी पक्षाला केवळ गोंधळ घालायचा होता. संधी देऊनही मत मांडले नाही, ही बाब चुकीची आहे.- राहुल जाधव, महापौरसंतपीठाच्या कामातील ठेकेदारांच्या संभाषणावरून रिंग झाल्याचे सिद्ध होते. त्यामध्ये तीन ठेकेदारांनी मिळून रिंग केल्याचे ठेकेदारांनी मान्य केले आहे. रिंग संदर्भात बोलत असताना महापौरांनी बोलून दिले नाही. ध्वनिफीत महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांना देणार आहे.- दत्ता साने,विरोधी पक्षनेतेचिखलीतील संतपीठ, भोसरी रुग्णालयाचे खासगीकरण हे विषय महत्त्वाचे होते. या प्रमुख विषयांवर साधकबाधक चर्चा होणे अपेक्षित होते. परंतु, राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांनी गोंधळ घातला आणि भाजपाने या गोंधळातच महत्त्वाचे विषय केवळ दोन मिनिटांत विनाचर्चा मंजूर केले. गदारोळ नियोजनबद्ध आहे.- राहुल कलाटे, गटनेते, शिवसेनाचर्चा न करता विषय मंजूर करण्याचा सपाटा लावला आहे. सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही मिळून लोकशाहीचा गळा घोटत आहेत. भोसरीतील रुग्णालयाचे खासगीकरण या विषयावर आम्ही बोलणार होतो. मात्र, राष्ट्रवादीने गोंधळ घातल्याने बोलता आले नाही. खासगीकरणाविरोधात न्यायालयात जाणार आहे़- सचिन चिखले, गटनेते, मनसे‘लोकमत’च्यावृत्ताची दखलसभा कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी चिखलीतील प्रस्तावित संतपीठ उभारणी कामातील अनागोंदी, भ्रष्टाचारावर टीका केली. तसेच, भाजपाच्या राजवटीत सुरू असलेल्या मोठ्या बांधकामांच्या निविदांमध्ये रिंग कशी होती? याबाबतचे लोकमतच्या वृत्ताचा आधार घेऊन सत्ताधारी भाजपा आणि महापालिका प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केले. त्यावर सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. पवार म्हणाले, ‘‘विषयावर बोलायचे सोडून गोंधळ घालण्यातच विरोधकांना रस आहे. ही बाब चुकीची आहे.’’
संतपीठावरून गोंधळ; मानदंड पळविण्याचा विरोधकांचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2019 1:24 AM