पिंपरी : कपडा मार्केट, शगून चौक येथील अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या पालिकेच्या अधिकाऱ्यांना मारहाण करून त्यांनी जप्त केलेले सामान ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. ही घटना गुरुवारी (दि.१२) दुपारी साडेबारा ते एकच्या सुमारास घडली. या प्रकरणी महापालिकेच्या महिला अधिकाऱ्याने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदावर नोकरीस आहेत. फिर्यादी त्यांच्या सहकारी अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांसोबत अतिक्रमण निर्मुलनाचे काम करत होत्या. त्यावेळी आरोपी महिलांनी त्यांच्याशी हुज्ज घालून त्याच्या सहकारी अधिकाऱ्याच्या तोंडावर हाताबुक्क्यांनी मारून जखमी केले.
तसेच जप्त करीत असलेले सामान ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. आरोपी महिलांना महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांनी अडविण्याच्या प्रयत्न केला. तर, त्यांनी एका जवानाला देखील धक्काबुक्की केली. त्याचवेळी महिला आरोपी फिर्यादीशी हुज्जत घालून इतर दोन आरोपींशी संगणमत करून फिर्याद व त्यांच्या सहकऱ्यांना शिवीगाळ केली. तसेच फिर्यादीने कारवाई करू नये यासाठी इतर दुकानदारांना दुकाने बंद करण्यास सांगून फिर्यादी करीत असलेल्या सरकारी कामात अडथळा आणला, असे फिर्यादीत नमूद आहे.