पिंपरी : पवना धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने पाणी कपातीचे संकेत महापालिका प्रशासनाने दिले आहेत. गुरूवारी झालेल्या पाणीपुरवठा विभाग आणि गटनेत्यांच्या बैठकीत तूर्तास कपात करू नये, अशी आग्रही भूमिका लोकप्रतिनिधींनी मांडली. तर पाणी कपात करावीच लागेल, अशी भूमिका प्रशासनाने मांडली. त्यामुळे दिवसाआड की आठवड्यातून एकदा पाणी कपात याविषयी पुढील आठवड्यात निर्णय होणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका परिसराला पवना धरणातून पाणी पुरवठा होता. पाऊस लांबल्याने धरणातील पाणीसाठा ऐशी टक्यांवर आला आहे. त्यामुळे पाणी कपात करावी लागेल, असे प्रशासनाने सूचित केल्यानंतर आज पाणी पुरवठा विभाग आणि गटनेत्यांची बैठक झाली. यावेळी महापौर राहूल जाधव, आयुक्त श्रावण हर्डीकर, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने, शिवसेना गटनेते राहूल कलाटे, मनसे गटनेते सचिन चिखले, अपक्ष गटनेते कैलास बारणे, पाणी पुरवठा विभागाचे सहशहर अभियंता मकरंद निकम, कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत आदी उपस्थित होते. यावेळी पाणी कपात न करता पाण्याचे नियोजन करावे, अशी सूचना गटनेत्यांनी केली. महापौर म्हणाले, ‘‘धरणात पूरेसा साठा आहे. तूर्तास कोणत्याही प्रकारची पाणी कपात करू नये, पाणीपुरठयाचे योग्य नियोजन करून, यासंदर्भातील अहवाल, नियोजन आठ दिवसात तयार करावे, त्यानंतर बैठक होऊन यावर निर्णय घेण्यात येईल.’’
सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, ‘‘पाणी कपातीपेक्षा बचतीच्या उपाययोजना कराव्यात अशा सूचना केल्या आहेत. सध्या धरणात ७९ टक्के पाणी साठा आहे. गेल्यावर्षी हा साठा ९० टक्के होता. प्रतिदिन ४४० एमएलडी पाणी उचलले तरी जून अखेरीपर्यंत पाणी पूरणार आहे. आठवड्यातून एक दिवस पाणी नाही, असे नियोजन केल्यास एकोणीस दिवस अधिकचे पाणी मिळू शकते. त्यामुळे आठवडाभरात सर्वपर्यांयांवर अभ्यास करून नियोजन सादर करावे. याबाबत पुन्हा चर्चा करून निर्णय घेण्यात येईल.’’
आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, ‘‘धरणातील पाणी साठा पाहता, पाणी कपातीचे नियोजन करावे लागणार आहे. गेल्यावर्षीपेक्षा दहा टक्के साठा कमी आहे. तसेच जलसंपदा विभागाने ४८० ऐवजी ४४० एमएलडी पाणी उचलावे, अशा सूचना केल्या आहेत. त्यामुळे कपातीचे नियोजन करणे गरजेचे आहे. कपातीच्या विषयावर आज चर्चा झाली. त्यावर आठवड्यातून एकदा पाणी कपात करायची की दिवसाआड पाणी द्यायचे याविषयी अभ्यास करण्याच्या सूचना दिल्या आहेत.