पिंपरी-चिंचवड महानगरपालिका: स्थायी समितीच्या सभेत सदस्यांमध्ये हमरीतुमरी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2019 10:55 AM2019-12-05T10:55:57+5:302019-12-05T10:56:12+5:30
महापालिका स्थायी समितीची बुधवारी सभा झाली. यावेळी अध्यक्षस्थानी विलास मडिकेरी होते.
पिंपरी : महापालिका स्थायी समितीच्या बुधवारी झालेल्या साप्ताहिक सभेत कामकाजावरून सदस्यांमध्ये हमरीतुमरी झाली. नियम आणि परंपरा यावरून सत्ताधारी सदस्य आणि विरोधक यांच्यात जुंपली होती. स्थायीत मनमानी खपवून घेतली जाणार नसून, कायद्याने सभा चालवायची असेल तर टक्केवारी बंद करा, असा आक्षेप राष्ट्रवादी आणि शिवसेनेने घेतला आहे. तर नियमानुसार सभा कामकाज करायला प्राधान्य देणार असल्याचे अध्यक्ष विलास मडिगेरी यांनी प्रत्युत्तर दिले. या गोंधळामुळे पुढील आठवड्यांपर्यंत सभा तहकूब केली आहे.
महापालिका स्थायी समितीची बुधवारी सभा झाली. यावेळी अध्यक्षस्थानी विलास मडिकेरी होते. सभा होण्यापूर्वी नियोजनाची बैठक होत असते. ही बैठक आज झाली नाही. सभा कामकाज सुरू विषयाचे वाचन करायला सुरुवात करण्यापूर्वी सभा कामकाजावर चर्चा आणि चर्चेचे पर्यावसन वादात झाले. स्थायी समितीत झालेल्या वादावादीत भाजपा विरुद्ध शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस असे चित्र दिसून आले.
सत्ताधारी सदस्यांसह विरोधकांना समितीचे अध्यक्ष विश्वासात न घेता एकाधिकार शाहीने सभा चालवित असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नगरसेवक मयूर कलाटे यांनी केला. शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी अध्यक्षांना सभा ही प्रथा परंपरेने चालते की कायद्याप्रमाणे चालते, असा प्रश्न विचारला. त्यावर अध्यक्षांनी कायद्याविषयातील तरतूद काय ? याविषयीची माहिती नगर सचिवांना देण्यास सांगितले. त्यानंतर सभेचे कामकाज कायद्याप्रमाणे चालतो, असे सांगितले.
कोणत्याही विषयांवर चर्चा न होताच विषय मंजुरीचा धडाका लावण्याचे काम केले जात होते. सभेचे काम कायद्याप्रमाणे व्हावे, अशी आमची मागणी होती. आम्ही सन्मानाने बोलत असताना आवाज दाबण्याचे काम केले जात होते. आमचे म्हणने ऐकूण घेतले जात नसेल तर अशा सभांना अर्थ काय? कोणाचीही हुकूमशाही खपवून घेतली जाणार नाही. एकेरी भाषा वापरणे योग्य नाही. - राहुल कलाटे ( शिवसेना गटनेते )
सभेचे कामकाज नियमानुसार व्हायला हवे. प्रत्येक सभेत सदस्यांनी विचारलेली माहिती विविध प्रश्नांवर चर्चा व्हायला हवी. चर्चा झाली तर शहरात विविध प्रश्न काय आहेत, हे समजणार आहे. मात्र, आजच्या सभेत सत्ताधाऱ्यांना घाई कशाची आणि कशासाठी होती हे कळले नाही. आमच्या अधिकारांवर कोणी गदा आणत असेल तर खपवून घेतले जाणार नाही. अध्यक्षांनी सदस्यांशी एकेरी भाषेचा वापर करणे गैर होते. - मयूर कलाटे ( राष्ट्रवादी )
विविध बैठकांमुळे पूर्वबैठक झाली नाही. कामकाज सुरु होण्यापूर्वीच काही सदस्यांनी गोंधळ घातला. त्यांचा उद्देश काय हे समजले नाही. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरेही दिली. कायद्यानुसारच सभागृहाचे कामकाज सुरु असते. पीठासन अधिकाऱ्यांना दिलेल्या अधिकारानुसार काम केले जाते. कोणाच्याही अधिकारांवर गदा आणली जात नाही. आम्ही एकेरी भाषा वापरली नाही. विरोधी सदस्यच गैरवर्तन करीत होते. -विलास मडिगेरी ( स्थायी समितीचे अध्यक्ष )