आयुक्तालय जागानिश्चितीला वेग, मुंबई येथील बैठकीत पोलीस महासंचालक सतीश माथूर यांचा आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 03:29 AM2018-05-09T03:29:56+5:302018-05-09T03:29:56+5:30
पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळून दीड महिन्याचा कालावधी उलटला आहे. तात्पुरत्या स्वरूपात भाडेतत्त्वावर जागा घेऊन पोलीस आयुक्तालय सुरू करायचे आहे.
पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळून दीड महिन्याचा कालावधी उलटला आहे. तात्पुरत्या स्वरूपात भाडेतत्त्वावर जागा घेऊन पोलीस आयुक्तालय सुरू करायचे आहे. शहरात १२ इमारती आणि ६ मोकळ्या जागा आहेत. त्यातून जागा निश्चित करण्यासाठी कामाचा वेग वाढवा, त्यानंतर मुनष्यबळ उपलब्ध करून देण्याची कार्यवाही होईल, असा आदेश पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी मुंबईत झालेल्या बैठकीत पुणे शहर पोलीस अधिकाऱ्यांना दिले.
महाराष्टÑदिनी पिंपरी-चिंचवडमध्ये पोलीस आयुक्तालय सुरू करण्याचे सूतोवाच होते. परिमंडल तीनचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी महापालिका प्रशासनाला पत्र देऊन प्रेमलोक पार्क, चिंचवड येथील शाळा इमारत आयुक्तालयासाठी देण्याबाबतचे पत्र दिले होते. मात्र नागरिकांनी शाळा इमारत देण्यास विरोध केला. त्यामुळे ही जागा निश्चित होऊ शकली नाही. पोलीस आयुक्तालय सुरू होण्याचा महाराष्ट्र दिनाचा मुहूर्त टळला. या प्रकाराला ‘लोकमत’ने वृत्तमालिकेद्वारे वाचा फोडली होती. ‘आयुक्तालयाच्या घोषणेचा फज्जा’ असा अग्रलेख प्रसिद्ध झाला. दरम्यान, पोलीस महासंचालक आणि पालकमंत्र्यांनी लक्ष घातल्याशिवाय पोलीस आयुक्तालय सुरू होण्याच्या हालचालींना वेग येणार नाही, असे मत ‘लोकमत’शी बोलताना विधान परिषद सदस्या डॉ. नीलम गोºहे यांनी व्यक्त केले होते. शासन स्तरावर मंजुरी मिळाल्यानंतरही पोलीस प्रशासनाची, तसेच जागा देण्याबाबत महापालिका प्रशासनाची उदासीनता दिसून येत असल्याबद्दल नागरिकांनी खंत व्यक्त केली होती. पोलीस आयुक्तालय सुरू होण्यास विलंब होत असल्याचा मुद्दा चर्चेत येताच पोलीस महासंचालक माथूर यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील, तसेच पिंपरी विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांची मुंबईला तातडीची बैठक बोलावली.
आयुक्तालयासाठी तात्पुरती व्यवस्था
तात्पुरत्या स्वरूपात पोलीस आयुक्तालय सुरू करायचे आहे,
नंतर शासन स्तरावर उपलब्ध
होणाºया जागेवर कायमस्वरूपी पोलीस आयुक्तालय स्थलांतरित होणार आहे. परिमंडल तीनचे
पोलीस उपायुक्त शिंदे यांनी पुणे शहर पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्यामार्फत यापूर्वीच पोलीस आयुक्तालयाच्या जागांचा प्रस्ताव शासनाला पाठविला आहे. प्र्रेमलोक पार्क, निगडीतील शाळा इमारत, मोशीतील प्राधिकरणाची जागा, एचए कंपनीचा भूखंड, ताथवडे येथील जागा, प्राधिकरण कार्यालय, गायरान जागा आदी ठिकाणी जागा आहेत. तात्पुरत्या स्वरूपात आयुक्तालय सुरू करण्यात येणार असल्याने यापैकी सोईस्कर ठरणारी जागा निश्चित करा.
आयुक्त कार्यालय, अप्पर आयुक्त, उपायुक्त, सहायक आयुक्त या कार्यालयांसाठी पुण्याप्रमाणे एकाच ठिकाणी जागेची निवड करता येईल, असे सांगून जागा निश्चित होताच मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची कार्यवाही तातडीने होऊ शकेल, असा विश्वास पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी बैठकीत व्यक्त केला.
शहरातील १२ इमारती, ६ मोकळ्या भूखंडांचा पर्याय
- महासंचालकांनी मुंबईत बैठक आयोजित केली असल्याने तत्पूर्वी शनिवारी नवीन पोलीस आयुक्तालय नियोजन व समन्वय विभागाचे अप्पर महासंचालक रितेश कुमार यांनी पुन्हा एकदा पिंपरी-चिंचवड शहरातील जागांची पाहणी केली. अप्पर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, तसेच परिमंडल तीनचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांच्यात नेमकी कोणती जागा निश्चित केली जावी, या मुद्द्यावर चर्चाही झाली. शहरातील १२ इमारती आणि सहा मोकळ्या जागांची इत्थंभूत माहिती घेऊन महासंचालकांपुढे सादरीकरण करण्यात आले. बैठकीस अप्पर महासंचालक रीतेश कुमार, पुणे ग्रामीण अधीक्षक सुवेझ हक, पुणे शहर मुख्यालयाचे उपायुक्त बी. जी. गायकर, पिंपरी विभागाचे उपायुक्त गणेश शिंदे उपस्थित होते.