पिंपरी : गस्तीवरील पोलिसांनी नाकाबंदीच्या ठिकाणी वाहनांची तपासणी केली असता, दोघा संशयितांना हटकले. त्यांच्या दुचाकीची कागदपत्रे मागितली, त्या वेळी उडवाउडवीची उत्तरे त्यांनी दिली. दुचाकीच्या डिकीत त्यांना घरफोडीचे तसेच चोरीचे साहित्य मिळाले. अधिक चौकशी केली असता, आणखी तिघांची नावे त्यांनी सांगितली. तसेच विविध ठिकाणी केलेल्या घरफोड्यांची माहिती दिली. त्यांच्याकडून वाहनचोरी, घरफोडीचे २१ गुन्हे उघड झाले. चौघांना अटक केली असून २३ लाख ३५ हजार ५०० रुपयांच मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली.राजू शंभू देवनाथ (वय १९, रा. कृष्णानगर, हडपसर), मंगेश विजय चव्हाण (वय २२, रा. गोखलेनगर), मजहर नॅजो जमादार (वय ३०, शिवाजीनगर), अल्ताफ ऊर्फ बचक्या पठाण अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याबरोबर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडे पिस्तूल आणि सहा जिवंत काडतुसे आढळून आली.राजू देवनाथ, मंगेश चव्हाण व अल्पवयीन मुलगा असे तिघे मजहर याच्या आॅटो रिक्षातून चोरी करण्यासाठी जात असत. तर बचक्या पठाण यांच्यामार्फत चोरलेल्या मालाची विल्हेवाट लावली जात असे. आरोपींकडून एकूण २३ लाख ३५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्यांच्याकडून वाहनचोरीचे ४, घरफोडीचे १४ आणि इतर ३ गुन्हे उघडकीस आले आहेत. मुद्देमालात चांदीचे देवीचे मुखवटे, एलईडी टीव्ही संच, लॅपटॉप, मोबाईल आदी वस्तूंचा समावेश आहे.
पिंपरी : घरफोडीतील चार आरोपींना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 5:58 AM