पिंपरी महापालिका प्रशासनात आचारसंहिता शिथिलतेबाबत संदिग्धता
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2019 07:07 PM2019-05-08T19:07:12+5:302019-05-08T19:09:00+5:30
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने राज्यात लागू असलेली आदर्श आचारसंहिता शिथिल केली आहे.
पिंपरी : दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने राज्यात लागू असलेली आदर्श आचारसंहिता शिथिल केली आहे. मात्र, याबाबतच्या राज्य शासनाच्या पत्राचा अन्वयार्थ न लागल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेतील प्रशासनात संदिग्धता निर्माण झाली आहे.
राज्यातील अनेक भागांत दुष्काळी स्थिती निर्माण झाली असून प्रशासनाकडून यासंदर्भात विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र, राज्यात आदर्श आचारसंहिता लागू असल्यामुळे दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीत अडचणी येत होत्या. राज्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे संबंधित कामांसाठी आचारसंहिता शिथिल करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी एका पत्राद्वारे आयोगाकडे केली होती. त्यानुसार निवडणूक आयोगाने मागणी मान्य केल्याचे शासनाचे म्हणणे आहे. हे पत्र शासकीय भाषेत असल्याने शासनाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकाचा अन्वयार्थ न लागल्याने महापालिका क्षेत्रांसाठी आचारसंहिता शिथील झाली की नाही, याबाबत महापालिका प्रशासनात संदिग्धता निर्माण झाली. पिंपरी-चिंचवड महापालिकेशेजारील पुणे महापालिकेने काही निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. मात्र, पिंपरी महापालिका काय धोरण घ्यायचे याबाबत संदिग्ध आहे.
याबाबत अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील म्हणाले, शासनाच्या पत्रावरून दुष्काळग्रस्त भागासाठी आचारसंहिता शिथील केल्याचे म्हटले आहे. अन्य कोणत्या महापालिकांनी या आदेशाचा काय अर्थ घेतला याबाबत बोलणे उचीत ठरणार नाही. याबाबत माहिती घेण्याचे काम सुरू आहे. आचारसंहितेचा भंग होऊ नये, याची दक्षता घेतली जाणार आहे.ह्णह्ण