पिंपरी महापालिकेचे 'होऊ द्या खर्च' :क्रीडा स्पर्धेवर उधळले सव्वा कोटी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2020 06:19 PM2020-02-03T18:19:48+5:302020-02-03T18:23:24+5:30
उपमहापौर तुषार हिंगे यांनी स्पर्धेची अंतिम फेरी, बक्षीस वितरण समारंभ आणि सांस्कृतिक कार्यक्रम आकर्षक होण्याचा हट्ट धरला आहे. त्यासाठी आवश्यक विद्युत स्पिकर, लाईट, तसेच माईक व्यवस्था आदींची व्यवस्था करण्याची जबाबदारी महापालिका ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाच्या विद्युत विभागाकडे देण्यात आली आहे.
पिंपरी : महापालिकेतर्फे आयोजित केलेल्या महापौर चषक शालेय क्रीडा स्पर्धेवर उधळपट्टी सुरू असून, सांस्कृतिक कार्यक्रमांचा हट्ट उपमहापौरांनी केल्याने स्पर्धेचा खर्च २० लाखांनी वाढला आहे. त्यामुळे सव्वाकोटी रुपये खर्च केला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने महापौर चषक शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेचा समारोप बालेवाडी क्रीडा संकुलामध्ये होणार आहे. स्पर्धेसाठी प्रायोजक शोधण्याचे प्रयत्न सुरू आहे, असे सांगितले. त्यानंतर ठेकेदारांचे भले करणाऱ्या महापालिका प्रशासनाने शब्द फिरवित महापालिकेचर भार टाकला आहे. सुरुवातीलाच स्पर्धेसाठी ६५ लाख रुपयांचे गणवेश किट खरेदी केले. अन्य खर्चासाठी सुमारे ६७ लाख रुपये खर्च आला. त्यातील ३० लाख रुपये एस्पायर इंडिया या कंपनीने उभे केले आहेत. उर्वरित ४७ लाख रुपये महापालिकेने दिले आहेत. त्यामुळे या कोट्यवधींचा खर्च होत आहे. उपमहापौर तुषार हिंगे यांनी स्पर्धेची अंतिम फेरी, बक्षीस वितरण समारंभ आणि सांस्कृतिक कार्यक्रम आकर्षक होण्याचा हट्ट धरला आहे. त्यासाठी आवश्यक विद्युत स्पिकर, लाईट, तसेच माईक व्यवस्था आदींची व्यवस्था करण्याची जबाबदारी महापालिका ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाच्या विद्युत विभागाकडे देण्यात आली आहे.
आता बक्षीस वितरणास खर्च
त्याची पाहणी करून उपमहापौरांनी स्पर्धेच्या समारोपप्रसंगी आकर्षक रंगीत प्रकाश व्यवस्था, जसे की पार लाइट, ब्लायंडर लाइट, शार्पी लाइट, ट्रससह स्पिकर अशी महागडी व्यवस्था, तसेच सीसीटीव्ही व्यवस्था करावी. त्यासाठी स्वतंत्र जनरेटरसह विद्युत व्यवस्था करावी, अशा सूचना दिल्या आहेत. त्यासाठी अंदाजे १८ लाख ३६ हजार ८५४ रुपये इतका खर्च येणार आहे. या व्यतिरिक्त इंधनासह जनरेटरसाठी स्वतंत्र १ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे उपमहापौरांच्या या हट्टामुळे महापौर चषक स्पर्धेचा खर्च १९ लाख ३६ हजार ८५४ रुपयांनी वाढणार आहे.
सर्व काही थेट पद्धतीने
स्पर्धेच्या कामाची तातडी लक्षात घेता निविदा प्रसिद्ध न करता थेट पद्धतीने ‘सांस्कृतिक व कलाधोरण’ या लेखाशिषावरून हा खर्च केला जाणार आहे. परिणामी, महापौर चषक स्पर्धेचा खर्च सुमारे १ कोटी ३६ लाखांवर पोहचला आहे. पदाधिकाऱ्यांचा हट्ट पुरविण्याचा घाट सत्ताधाऱ्यांनी घातला आहे. त्यामुळे फुटकळ बचतीचे धोरण राबवून स्वत:ची पाठ थोपटण्याच्या सत्ताधाऱ्यांच्या धोरणावर टीका होत आहे.