पंतप्रधानांच्या आवाहनाला पिंपरीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ; फटाके वाजवून देशभक्तीपर घोषणाबाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2020 10:10 AM2020-04-06T10:10:12+5:302020-04-06T10:47:46+5:30
कोरोना महामारीचा मुकाबला करण्यासाठी एकत्र येण्याची गरज असल्याचे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घरात दिवे लावण्याचे देशवासीयांना आवाहन केले होते. पिंपरी-चिंचवडकरांनी देशभक्तीपर घोषणा देत फटाके वाजवून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
पिंपरी : कोरोना महामारीचा मुकाबला करण्यासाठी एकत्र येण्याची गरज असल्याचे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घरात दिवे लावण्याचे देशवासीयांना आवाहन केले होते. पिंपरी-चिंचवडकरांनी देशभक्तीपर घोषणा देत फटाके वाजवून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. चाळी आणि काॅलनीतील नागरिक या वेळी रस्त्यावर आले होते.
लॉकडाऊन होण्यापूर्वी देखील पंतप्रधान यांच्या टाळ्या, थाळ्या वाजविण्याच्या आवाहनाला नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिल्याचे दिसून आले. सर्वसामान्य नागरिकांसाठी लढणाऱ्या पोलीस, डॉक्टर, पालिका अधिकारी कर्मचारी यांचा उत्साह वाढविण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला होता. यानंतर लॉकडाऊनच्या काळात नागरिकांचे मनोबल उंचावण्यासाठी तसेच त्यांच्यात सकारात्मकता निर्माण करण्यासाठी दिवे लावा या आवाहनाला देखील तितकाच सकारात्मक व उत्साहपूर्ण प्रतिसाद दिल्याचे रविवारी रात्री दिसून आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत उद्योग नगरीत घरोघरी रविवारी रात्री नऊला लाईट नऊ मिनिटांसाठी बंद केले होते. बाल्कनी, ओट्यावर, दरवाजात, खिडकीत दिवे लावण्यात आले होते. तसेच काही नागरिक मोबाईल, टॉर्च यांची लाईट लावून घोषणा देत होते. भारत माता की जय, वंदे मातरम्, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय श्रीराम यासह गो कोरोना गो अशी घोषणाबाजी करण्यात आली. काही तरुणांनी रस्त्यावर उतरून फटाके वाजवले. काही हुल्लडबाज दुचाकी घेऊन आरडाओरडा करत रस्त्यावरून फिरत होते. महिला व मुलांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला.