‘पिस्तुलधारी’ निघाले लातूरचे ‘उपमहापौर‘ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 08:08 PM2018-05-17T20:08:14+5:302018-05-17T20:08:14+5:30

रहदारीच्या रस्त्यावरून जाणा-या दुचाकीस्वाराच्या मागे बसलेल्या व्यक्तीजवळ पिस्तूल असल्याचे पोलिसांना दिसले. त्यांनी सतर्कता दाखवित जवळच्या पोलीस स्टेशनला कळवून पोलिसांची जादा कुमक मागविली.

'pistol' user after enquiry declared Latur's 'Deputy Mayor' | ‘पिस्तुलधारी’ निघाले लातूरचे ‘उपमहापौर‘ 

‘पिस्तुलधारी’ निघाले लातूरचे ‘उपमहापौर‘ 

Next
ठळक मुद्दे पिस्तुलाचा परवाना असल्याने त्यांच्यावर याप्रकरणी गुन्हा दाखल नाही.

खडकी : पुण्यातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे येथील पोलीस यंत्रणा प्रचंड सतर्कता बाळगून आहे. थोडीजरी संशयास्पद हालचाल निदर्शनास आली तरी पोलीस यंत्रणा त्याचा मागोवा घेण्यात कोणतीही कसर सोडत नाही. गुरुवारी याच सतर्कतेचा प्रत्यय लातूरच्या उपमहापौर महोदयांना आला. घडलेला प्रसंग असा की, रहदारीच्या रस्त्यावरून जाणा-या दुचाकीस्वाराच्या मागे बसलेल्या व्यक्तीजवळ पिस्तूल असल्याचे पोलिसांना दिसले. त्यांनी सतर्कता दाखवित जवळच्या पोलीस स्टेशनला कळवून पोलिसांची जादा कुमक मागविली. पिस्तूलधारी महोदयांना काही अंतरावर सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. पोलीस ठाण्यात नेत त्यांच्याकडून पिस्तूल ताब्यात घेऊन चौकशी केली. संबंधित दुचाकीस्वाराने दिलेल्या माहितीची खातरजमा केली असता, ती मान्यवर व्यक्ती म्हणजे लातूरचे उपमहापौर असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्याकडे पिस्तुलाचा परवाना असल्याचेही समोर आले. असे असले, तरी खडकी पोलिसांच्या या सतर्कतेचे कौतुक होत आहे. 
देविदास रामलिंग काळे (वय ४५, रा. गाळेगल्ली, लातूर) असे संबंधित पिस्तूलधारकाचे नाव आहे. काळे हे लातूरचे उपमहापौर आहेत. चौकशी केल्यानंतर पोलिसांनी उपमहापौर काळे यांना सोडून दिले. काळे यांच्याकडे पिस्तुलाचा परवाना असल्याने त्यांच्यावर या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. खडकी पोलिसांनी याबाबत दिलेली माहिती अशी की, खडकी पोलीस ठाण्याचे कर्मचारी प्रदीप गाडे काम संपल्यानंतर रात्री घरी जात होते. त्या वेळी एक दुचाकीस्वार जाताना त्यांना दिसला. या दुचाकीस्वारासोबत बसलेल्या व्यक्तीचा गाडे यांना संशय आला. त्यामुळे त्यांनी दुचाकीस्वाराचा पाठलाग सुरू केला. 
दरम्यान, त्यांनी उपनिरीक्षक मदन कांबळे यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर सहकाºयांसह कांबळे खडकी बाजारातील महात्मा गांधी चौकात दाखल झाले. पुढे एका दुकानाजवळ संबंधित संशयित व्यक्ती थांबला होती. गाडे आणि कांबळे यांनी सहकाऱ्यांसह या दुचाकीस्वारास शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्याकडील पिस्तूलही पोलिसांनी काढून घेतले. पोलीस ठाण्यात त्याची चौकशी करण्यात आली. चौकशीसाठी संबंधित व्यक्तीने पूर्ण सहकार्य केले. मी लातूरचा उपमहापौर देविदास काळे आहे, असे संबंधिताने पोलिसांना सांगितले. त्याची खातरजमा करण्यात आली. काळे यांच्याकडे पिस्तुलाचा परवाना असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले.

Web Title: 'pistol' user after enquiry declared Latur's 'Deputy Mayor'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.