पिंपरी : शहरातील वाकड तसेच परिसरातील उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याने विविध भागात पाच ठिकाणी चोरी करून ७० ग्रॅम वजनाचे सोने, ७ वेगवेगळ्या कंपनीचे मोबाइल, नामांकित कंपनीची तीन घड्याळे व एक मोटारसायकल असा ३ लाख ७५ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. हा सर्व मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. गुन्हे शाखा युनिट ४ च्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंकज हरिप्रसाद बाजुगळे (वय २१, रा. रहाटणी) असे आरोपीचे नाव आहे. वाकड परिसरात काही दिवसांपासून उच्चभ्रू सोसायटीमध्ये चोऱ्यांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. या चोऱ्यांना आळा घालण्यासाठी गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्तांनी विषेश पथक स्थापन करून तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार गुन्हे शाखा ४ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन शिंदे व कर्मचाऱ्यांनी या चोरीचा छडा लावण्यासाठी शोध मोहीम सुरू केली होती. या चोऱ्यांचा शोध घेत असताना मिळालेल्या सीसीटिव्ही फुटेजवरून अरोपीचा माग काढत असताना आरोपी पंकज बाजुगळे हा उच्चभ्रू वस्तीमध्ये जाऊन चोऱ्या करीत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानुसार सापळा रचून आरोपी पंकज बाजुगळे याला काळेवाडी येथील धनगर बाबा मंदिराजवळून अटक केली. त्याला तब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने काळेवाडी, रहाटणी भागातील उच्चभ्रू सनसाईन व्हिला रो हाऊस सोसायटी, फाईव्ह गार्डन रोहाऊस सोसायटी व रॉयल हाऊस सोसायटीमध्ये चोरी केल्याचे कबूल केले. त्याच्याकडून पोलिसांनी ३ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून त्याने वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ४ व विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये १ चोरी केल्याचे उघड झाले आहे.
गुन्हे शाखा युनिट ४ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन शिंदे, उपनिरीक्षक हर्षल कदम, नारायण जाधव, धर्मराज आवटे, संजय गवारे, लक्ष्मण अढारी, वासुदेव मुंढे, संतोष अस्वले, सुरेश जायभाय, सुनील गुट्टे, गोविंद चव्हाण, तुषार काळे, धनाजी शिंदे व अजिनाथ ओंबासे यांनी ही कारवाई केली.