एमपीएससी करणाऱ्या तरुणानं चक्क खाकी परिधान करून खंडणी मागितली; पोलिसांच्या तावडीत सापडताच गजाआड रवानगी झाली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2021 11:19 AM2021-09-06T11:19:08+5:302021-09-06T11:24:35+5:30
गैरवापर करून तोतयेगिरी करणारा तरुण सांगवी पोलिसांच्या तावडीत सापडला असता त्याची गजाआड रवानगी झाली
पिंपरी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा (एमपीएससी) अभ्यास करताना तरुणाच्या मनात पोलिसांची क्रेझ निर्माण झाली अन् त्याने चक्क ‘खाकी’ परिधान केली. त्याचा गैरवापर करून तोतयेगिरी केली. मात्र तो सांगवी पोलिसांच्या तावडीत सापडला आणि त्याची गजाआड रवानगी झाली.
बुध्दभूषण अशोक कांबळे (वय २७, रा. म्हेत्रे वस्ती, निगडी, मूळ रा. अंबाजोगाई, जि. बीड), असे तोतया पोलिसाचे नाव आहे. त्याच्यासह औदुंबर भारत जाधव (वय २९, रा. कासारवाडी, मूळ रा. उस्मानाबाद) याला देखील सांगवी पोलिसांनी अटक केली.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुध्दभूषण हा पोलीस असल्याचे तर औदुंबर हा एसबीआय बँकेत मॅनेजर असल्याचे सांगत होता. पिंपळे गुरव येथे सृष्टी चौकात ३१ ऑगस्टला रात्री एका पान शॉपवाल्याकडे ते दोघे गेले. दुकान रात्री उशिरापर्यंत का चालू ठेवले, असे म्हणून त्यांनी हजार रुपयांची मागणी करून मोठमोठ्याने आरडाओरडा केला. त्यावेळी तेथून जात असलेल्या पोलीस कर्मचारी प्रमोद गोडे व अरुण नरळे यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. पोलिसांचा गणवेश घातलेली व्यक्ती दिसल्याने गोडे व नरळे त्यांच्याजवळ गेले. त्यांच्याकडे चौकशी केली. मी एसबीआय बँकेत मॅनेजर आहे,असं औदुंबरने सांगितले. मी मुंबई येथे क्राईम ब्रांचमध्ये पोलीस अधीक्षक या पदावर नेमणुकीस आहे, असं बुध्दभूषणने सांगितले. मात्र बुध्दभूषण यानं पोलीस उपनिरीक्षकाचा गणवेश परिधान केला होता. त्यामुळे आरोपींची तोतयेगिरी उघड झाली.
क्रेझ अन् करिअर...
बुध्दभूषण याने बीएसस्सीपर्यंतचे शिक्षण घेतले. एमपीएससी करून अधिकारी होण्याचे त्याचे स्वप्न होते. अभ्यासादरम्यान पोलिसांबाबत ‘क्रेझ’ झाली. दरम्यान, त्याने एका पेट्रोलपंपावर क्रेडीट कार्ड वितरणाचे काम सुरू केले. त्यावेळी तेच काम करणारा औदुंबर याच्याशी त्याची ओळख झाली. औदुंबरककडे बँकेचा लागो असलेला गणवेश होता. गणवेशाचा गैरवापर करून त्यांनी तोतयेगिरी केली.