पिंपरी : ऑनलाईन लॉटरीच्या नावाखाली सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत रोकड तसेच मोबाईल फोन असा एकूण ५१ हजार १७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पिंपरी येथे सामाजिक सुरक्षा पथकाने राजश्री लॉटरी सेंटर सोमवारी (दि. ९) दुपारी पावणेचारच्या सुमारास ही कारवाई केली.
मयूर रवींद्र जगताप (वय ३१, रा. काळेवाडी), दत्तात्रय रघुनाथ कदम (वय ४२, रा. सुदर्शन नगर, पिंपळे गुरव), गोकुळ वामन पाटील (वय ५, रा. रुपीनगर, तळवडे), रुपेश अशोक केसरवानी (वय ४०, रा. यमुनानगर, निगडी), सचिन सुभाष साळुंके (वय ३७, रा. शिवाजीनगर गावठाण, मनपा पाठीमागे, पुणे), विठ्ठल कचरू कांबळे वय ५०, रा. विठ्ठल नगर, नेहरूनगर, पिंपरी), बाबुराव सदाशिव जांभुळकर (वय ५२, रा. हिंजवडी गावठाण), काळूराम बाबू जाधव (वय ५२, रा. काळेवाडी), अनिल नंदलाल राजदेव (वय ४३, रा. रविकिरण सोसायटी, पिंपरी), अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. सामाजिक सुरक्षा पथकाचे पोलीस कर्मचारी राजेश विठ्ठल कोकाटे यांनी या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी येथे आंबेडकर चौकाकडून पिंपरी गावाकडे जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यालगत असलेल्या राजश्री लॉटरी सेंटर येथे ऑनलाइन लॉटरीच्या नावाखाली जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली. ऑनलाइन लॉटरी नावाचा जुगार घेऊन ते ऑनलाइन न करता लोकांना कागदी आकड्यांच्या चिठ्ठ्या देऊन त्यावर पैसे स्वीकारले. तसेच तसेच स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी हारजीत चा जुगार विनापरवाना खेळताना आरोपी मिळून आले. पोलिसांनी या कारवाईत ४३ हजार १६० रूपये रोख, आठ हजार १५ रूपये किमतीचा मोबाईल फोन, असा एकूण ५१ हजार १७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.