राज्यात पॉवर पेट्रोल शंभरी पार! इंधन दरवाढ सुरूच
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 01:55 PM2021-05-12T13:55:51+5:302021-05-12T13:56:12+5:30
साधे पेट्रोल ९८ तर, डिझेल 88 पार
पिंपरी : इंधन दरातील भाववाढ सुरूच असून, पॉवर पेट्रोलने १०१.७४ रुपयांचा टप्पा गाठला आहे. पेट्रोलचे भाव ९८ आणि डिझेलचे भाव ८८ रुपयांच्या पुढे गेले आहेत. पश्चिम बंगाल, तामिळनाडूसह पाच राज्यांचा निकाल जाहीर झाल्या नंतर पेट्रोल आणि डिझेलच्या भावात सातत्याने वाढ होत आहे. गेल्या नऊ दिवसांत साधे आणि पॉवर पेट्रोल लिटरमागे १.४४ आणि डिझेल १.७६ रुपयांनी महागले आहे.
बुधवारी साध्या पेट्रोलचा भाव ९८.०६, पॉवर पेट्रोल १०१.७४ आणि डिझेलचा भाव ८८.०८ रुपये प्रतिलिटर झाला आहे. मार्च २०२० मध्ये टाळेबंदी लागू झाली. व्यापार उदीम बंद झाल्याने सोपा पर्याय म्हणून राज्य आणि केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर सेस लागू केला. राज्य सरकारने एप्रिल २०२० मध्ये प्रतिलिटर दोन रुपये कर लागू केला. तर केंद्र सरकारने एप्रिल ते जून २०२० या कालावधीत तीनदा अबकारी कर वाढविला. काहीकाळ दर स्थिर राहिले. मात्र नोव्हेंबर २०२० पासून पेट्रोल आणि डिझेलच्या भावात सातत्याने वाढ होत आहे.
देशातील पाच राज्यात निवडणुका होत असल्याने फेब्रुवारी २०२१ नंतर इंधनाचे दर स्थिर ठेवण्यात आले. निवडणुकीचे वातावरण तापू लागल्यावर २४ मार्च ते १५ एप्रिल या कालावधीत दर कमी करण्यात आले. या काळात पेट्रोलचे भाव ५७ आणि डिझेलच्या भावात ५६ पैशांनी घट झाली. निवडणुकांचे निकाल लागताच घातलेले भाव निवडणूक पूर्व पदावर आले. त्या नंतरही वाढ सुरूच राहिल्याने इंधन भाव आता दररोजच आपला आदल्या दिवशीचा विक्रम मोडत आहेत.