पिंपरी-चिंचवड परिसरात मान्सूनपूर्व पावसाने नागरिकांची तारांबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2023 10:53 AM2023-06-05T10:53:05+5:302023-06-05T10:53:16+5:30
रविवारी सकाळपासूनच वातावरणात उकाडा जाणवत होता...
पिंपरी : गेल्या आठवडाभरापासून शहरात जोरदार पाऊस पडत आहे. सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटात शहरात दुपारी पाऊस पडला. रविवारी दुपारी आलेल्या वादळी पावसाने सुटीच्या दिवशी तारांबळ उडाली. प्राधिकरण परिसरात झाडे पडली होती.
गेल्या आठवडाभरापासून सायंकाळी जोरात पाऊस पडत आहे. रविवारी सकाळपासूनच वातावरणात उकाडा जाणवत होता. दुपारी बारानंतर उकाडा वाढला. आकाशात ढग जमायला सुरुवात झाली. दुपारी दीडच्या सुमारास पावसास सुरुवात झाली. सुरुवातीला सोसाट्याचा वारा येत होता. त्यानंतर मोशी, भोसरी, प्राधिकरण, संभाजीनगर, इंद्रायणीनगर, आकुर्डी, चिंचवड या भागांत पावसाने हजेरी लावली. पिंपरी, सांगवी, वाकड, थेरगाव परिसरातही पाऊस झाला.
प्राधिकरणात झाडे पडली
दुपारी दीड ते अडीच या वेळेत सोसाट्याचा वारा आणि गारांसह मुसळधार पाऊस झाल्यामुळे काही काळ येथील जनजीवन विस्कळीत झाले होते. म्हाळसाकांत महाविद्यालयाच्या पुढील चौकात रस्त्यांवरच झाड पडले. त्यानंतर नागरिकांनी अग्निशमन विभागास कळविले. त्यानंतर झाडाच्या फांद्या तोडून झाड हटविण्यात आले. वाहतूक सुरळीत करण्यात आले.
कामगारवर्गास बसला फटका
दिवसभर वातावरणात उष्णता आणि सायंकाळी पाऊस पडत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. कामगारवर्गाला घरी परतताना पावसाचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना या पावसामुळे सर्वाधिक त्रास झाला. अचानक आलेल्या पावसामुळे रस्त्याच्या कडेला आडोसा शोधला.