चिंचवड : प्रवाशांकडून भाड्यापोटी अव्वाच्या सव्वा पैसे उकळणारे, त्यांच्याशी अरेरावीची भाषा वापरणारे अशी काहीशी रिक्षाचालकांबद्दलची समाजमनात प्रतिमा आहे.परंतु चिंचवडमधील एका रिक्षाचालकाने करकरीत नोटा, एटीएम कार्ड, क्रेडिट कार्डच्या पासवर्डसह सापडलेले लाखाचे पाकीट परत केले. एकीकडे आॅनलाइन दरोडा टाकणारे चोरटे नागरिकांच्या कष्टाच्या कमाईवर डल्ला मारत असताना या रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणाचे कौतुक होत आहे.दळवीनगर, चिंचवड येथील रिक्षाचालक ज्ञानेश्वर घुले हे बुधवारी दुपारी दोनला चिंचवडमधील चापेकर चौकातून दळवीनगरकडे जात होते. त्या वेळी प्रेमलोक पार्क परिसरात मुख्य रस्त्यावर त्यांना एक पाकीट दिसले. त्यांनी रिक्षा बाजूला घेऊन पाकीट ताब्यात घेतले आणि लोकमत प्रतिनिधींशी संपर्क साधला. सापडलेले हे पाकीट चिंचवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांच्याकडे सुपूर्त केले. या पाकिटात आठ हजार रुपयांच्या कोºया नोटा, एटीएम कार्ड, डेबिट कार्ड, पॅन कार्ड व इतर अनेक महत्त्वाची कागदपत्रे असल्याचे उघड झाले. मात्र, यामध्ये कोणत्याही प्रकारची माहिती अथवा संपर्क क्रमांक नव्हता; मात्र हे पाकीट बाबासाहेब तनपुरे यांचे असल्याचे यातील कार्डवरून दिसत होते. मात्र तनपुरे यांच्या वाहन परवान्यावर अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी असा पत्ता होता. कोणत्याही प्रकारचा संपर्क क्रमांक नसल्याने पोलिसांनी बँकेत जाऊन तनपुरे यांच्या सध्याच्या घराचा चिंचवड येथील पत्ता शोधला. घरी जाऊन घटनेची माहिती त्यांच्या पत्नीला दिली. तनपुरे यांनी लगेचच चिंचवड पोलीस स्टेशन गाठले. अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे व रोख रक्कम परत मिळाल्याने त्यांनी रिक्षाचालक घुले व पोलिसांचे आभार मानत माणुसकी अजूनही जिवंत असल्याची भावना व्यक्त केली.तनपुरे यांचा हॉटेल व्यवसाय आहे. या व्यावसायिक खात्याचे कार्ड व त्याचा पासवर्ड या पाकिटात होता. या खात्यावर दीड लाख रुपये होते. एखाद्या भामट्याच्या हाती हे पाकीट गेले असते तर काहीही होऊ शकले असते. मात्र घुले यांनी प्रामाणिकपणा दाखवीत हे पाकीट परत केल्याने तनपुरे यांनी त्यांचे आभार मानले.
माणुसकी जिवंत असल्याचा प्रत्यय; रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा, सापडलेले पैशांचे पाकीट पोलिसांच्या हवाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 5:51 AM