पिंपरी-चिंचवड (वाकड) : स्वच्छतेसाठी केवळ महापालिका प्रशासनावर अवलंबून न राहता समाजातील प्रत्येक घटकाने एक पाऊल पुढे टाकत सार्वजनिक स्वच्छतेमध्ये भाग घेऊन आपले सामाजिक योगदान दिले पाहिजे, असे प्रतिपादन पिंपरी-चिंचवड महापालिकेची ब्रॅण्ड अॅम्बेसेडर अर्जुन पुरस्कार विजेत्या अंजली भागवत यांनी केले.वाकड येथील कल्पतरू चौक, वाकड-हिंजवडी रस्ता व परिसरांतील सोसायट्यांना नगरसेवक तुषार कामठे यांच्यासह भेट देत स्वच्छतेची पाहणी त्यांनी केली, त्या वेळी त्या बोलत होत्या. पद्मावती धारा येथील पदाधिकाऱ्यांशीही स्वच्छतेविषयी सखोल चर्चा केली. पद्मावती धाराचे अध्यक्ष मिलिंद पाटील, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अशोक लालगुणकर, मंदार भागवत, सचिन कणसे, उपाध्यक्ष योगेश कुलकर्णी, खजिनदार राहुल गोरे, मनोहर पाटील, सचिव उत्कर्ष कवाडिकर, कुलदीप सिंग इत्यादी सभासदांनी सहभाग घेतला.यावेळी परिसरातील विविध समस्यांचा आढावा घेण्यात आला. या चर्चेमध्ये परिसरात नियमित पाणीपुरवठा, कचऱ्याचे विभाजन व वर्गीकरण, वाहतूककोंडी, अनधिकृत फलक व इतर विषय हताळण्यात आले. नगरसेवक तुषार कामठे यांनी पाणीगळती थांबविण्याचे काम महापालिकेने हाती घेण्यात आल्याचे सांगितले. तसेच प्रभागातील नविन उपक्रम व योजना यांची माहिती नागरिकांना दिली. अध्यक्ष मिलिंद पाटील म्हणाले, की परिसर स्वच्छ राखण्याकरिता जनजागृती करणे आवश्यक आहे. स्वच्छ भारत अभियान यशस्वी करण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे. तसेच चांगल्या आणि निरोगी आयुष्याकरीता केवळ घराची स्वच्छता पाळून चालणार नाही, तर आपण जेथे वास्तव्य करतो तो संपूर्ण परिसर स्वच्छ ठेवणे ही काळाची गरज आहे, असे नमूद केले. वाकड येथील कल्पतरू चौक, वाकड-हिंजवडी रस्त्याचा काही भाग व पद्मावती धारा येथे उत्स्फूर्तपणे लोकसहभागातून स्वच्छता अभियान नियमित राबविण्यात येतो. हा उपक्रम दर महिन्याच्या पहिल्या रविवारी राबविण्याचा संकल्प सर्व सभासदांनी केला आहे, असे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अशोक लालगुणकर यांनी जाहीर केले. पालिकेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या आदर्श पर्यावरण संतुलित सोसायटी स्पर्धांमध्ये पद्मावती धारा येथील सभासदांचा भाग घेण्याचा मानस आहे. त्याकरीता अशोक लालगुणकर यांच्या अध्यक्षतेखाली सोसायटीमध्ये एक समिती घटित करून व अंजली भागवत यांच्या मार्गदर्शनाने व नगरसेवक तुषार कामठे यांच्या मदतीने पुढील दिशा ठरविण्यात येईल, असे अध्यक्ष मिलिंद पाटील व खजिनदार राहुल गोरे यांनी सांगितले.
पिंपरी चिंचवड महापालिका ब्रॅण्ड अॅम्बेसेडर अंजली भागवतने जाणून घेतल्या सोसायट्यांच्या समस्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 12:51 PM
प्रत्येक घटकाने एक पाऊल पुढे टाकत सार्वजनिक स्वच्छतेमध्ये भाग घेऊन आपले सामाजिक योगदान दिले पाहिजे, असे प्रतिपादन पिंपरी-चिंचवड महापालिकेची ब्रॅण्ड अॅम्बेसेडर अर्जुन पुरस्कार विजेत्या अंजली भागवत यांनी केले.
ठळक मुद्देवाकड येथील कल्पतरू चौक, वाकड-हिंजवडी रस्ता व परिसरांतील सोसायट्यांना दिली भेटपरिसर स्वच्छ राखण्याकरिता जनजागृती करणे आवश्यक : मिलिंद पाटील