पिंपरीत साकारणार अपंग कल्याणकारी केंद्र, सात कोटी पाच लाखांच्या खर्चाचा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 06:17 AM2018-02-27T06:17:22+5:302018-02-27T06:17:22+5:30
महापालिकेची स्थायी समिती सभा बुधवारी होणार असून, अपंगांसाठी पिंपरीत कल्याणकारी केंद्र बांधणार आहे. त्यासाठी सात कोटी पाच लाख रुपयांचा खर्च येणार असून, याबाबतचा प्रस्ताव स्थायी समोर मान्यतेसाठी ठेवला आहे.
पिंपरी : महापालिकेची स्थायी समिती सभा बुधवारी होणार असून, अपंगांसाठी पिंपरीत कल्याणकारी केंद्र बांधणार आहे. त्यासाठी सात कोटी पाच लाख रुपयांचा खर्च येणार असून, याबाबतचा प्रस्ताव स्थायी समोर मान्यतेसाठी ठेवला आहे.
महापालिकेतील स्थायी समितीच्या विषयपत्रिकेवर सुमारे ९१ विषय आहेत. त्यात पंतप्रधान आवास योजना, वेस्ट टू एनर्जी, तसेच महापालिकेतील विविध प्रभागांतील रस्त्यांची आणि स्थापत्यविषयक कामे अधिक आहेत.
शहरातील अपंगांसाठी कल्याणकारी केंद्र बांधण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात होती. त्यानंतर महापालिकेने पिंपरी येथील सर्व्हे नंबर ३१.१ आणि सहामधील जागेमध्ये नि:समर्थ अपंगांसाठी कल्याणकारी केंद्र बांधण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी निविदा मागविण्यात आली होती. देव कन्स्ट्रक्शन यांनी आठ कोटी सहा लाख रुपयांची निविदा भरली आहे. या ठेकेदाराकडून १२.५७ टक्के कमी दराने म्हणजेच सात कोटी पाच लाख रुपयांमध्ये काम करवून घेण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव बुधवारी होणाºया स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी ठेवला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका मोशीत वेस्ट टू एनर्जी प्रकल्प राबविणार आहे. त्यासाठी २०८ कोटी खर्च येणार आहे.
स्थापत्यविषयक कामे अधिक
महापालिकेच्या ह, क प्रभागात ठिकठिकाणी आवश्यकतेनुसार डांबरीकरण करण्यात येणार आहे. सांगवी येथील रस्त्याची विशेष दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. तसेच पिंपळे गुरव येथील रस्त्याच्या कडेने पेव्हिंग ब्लॉक बसविण्यात येणार आहेत. पिंपरी चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील भीमसृष्टीतील म्युरल्सकरिता विद्युतविषयक कामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी दोन कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. आकुर्डीतील विठ्ठल मंदिर परिसरात पालखी शिल्प उभारण्यात आणि सुशोभीकरण करण्यात येणार असून, त्यासाठी १ कोटींचा खर्च येणार आहे.
रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहाचे नूतनीकरण
चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहाचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी १८ कोटी खर्च केले जाणार आहेत, तर अग्निशामक विभागाकरिता तीन फायर कॅनन टॉवर व्हेईकल वाहने खरेदी करण्यात येणार आहेत. त्यासाठी आठ कोटी १४ लाख रुपयांचा खर्च येणार आहे. नाशिक फाटा ते वाकड या बीआरटीएस रस्त्यावर गोविंद गार्डन चौक येथे सबवे बांधण्यात येणार असून, त्यासाठी नऊ कोटी खर्च येणार आहे.