पुणे मेट्राेचे डबे रुळावर ; लवकरच हाेणार चाचणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2019 08:37 PM2019-12-30T20:37:16+5:302019-12-30T20:37:23+5:30
पुणे मेट्राेचे डबे पिंपरीमध्ये दाखल झाले असून आज ते रुळावर चढविण्यात आले. लवकरच त्यांची चाचणी घेण्यात येणार आहे.
पिंपरी : स्वारगेट ते पिंपरी या मेट्रोच्या पहिल्या टप्यात पिंपरी ते दापोडी काम पूर्णत्वास येत असून मेट्रो रेल्वेचे डबे रविवारी शहरात आले होते. हे डबे सोमवारी सकाळी मार्गिकेच्या रूळावर चढविण्यात आले आहेत. लवकरच चाचणीही घेण्यात येणार आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात महा मेट्रोचा रेल्वेचे डबे नागपूरवरून रविवारी वल्लभनगर येथे दाखल झाले. त्या डब्याचे पूजन महापौर उषा ढोरे व स्थायी समिती अध्यक्ष विलास मडिगेरी यांच्या हस्ते झाले होते. सोमवारी सकाळी डबे रूळावर चढविण्यासाठी पाचशे टनाची महाकाय क्रेन आणण्यात आली होती. क्रेनच्या सहाय्याने स्पॅनवर चढवून रूळावर ठेवले. डब्याचे नुकसान काही होऊ नये आणि तो कोठून वाकला जाऊ नये म्हणून जॅक लावले होते. तसेच संरक्षण म्हणून विशिष्ट लोखंडी सांचा बनवून हे डबे अत्याधुनिक पद्धतीने उचलून सुरक्षितपणे रूळावर ठेवले होते. त्यानंतर कोचला कर्मचाऱ्यांनी ढकलत काही अंतर चालविण्याचा प्रयत्न केला आहे.
वाहतूकीत बदल
जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर खराळवाडी ते नाशिक फाटयापर्यंतवाहतुकीत बदल केला आहे. मंगळवारपर्यंत दुपारी दोन वाजेपर्यंत एच. ए. कंपनीसमोरील मेट्रोच्या पिलरपासून पिंपरीहून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक खराळवाडी येथून मुंबई-पुणे मार्गावरील ग्रेड सेपरेटरमध्ये वळविली आहे. हा बदल नाशिक फाट्यापर्यंत राहील. खराळवाडी येथून एच. ए कंपनी वसाहतीकडे जाणाऱ्या वाहनांना सेवा रस्त्याने जाता येईल. एच. ए. कंपनीसमोरील अंडरपास नेहरूनगरकडे जाणारा मार्ग वाहतुकीसाठी खुला राहील. मात्र, पुण्याकडे जाणारा मार्ग बंद राहणार आहे; तसेच गुरुवारी सकाळी सात ते शनिवारी सकाळी सातपर्यंत एचए कंपनीसमोरून पुण्याकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक नाशिक फाटा येथून उलट दिशेने खराळवाडीपर्यंत जाईल. त्यानंतर पुणे-मुंबई लेनवरून वाहतूक सुरळीत होईल, असे कळविले आहे.
विद्युत काम झाल्यानंतर हाेणार चाचणी
मेट्रो मार्गिकेवरील विद्युत काम, सिग्नल व्यवस्थचे काम पूर्ण झाल्यानंतर तसेच, रेल्वे विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्यानंतर महामेट्रोकडून चाचणी घेण्यास सुरूवात केली जाणार आहे. येत्या पाच दिवसात दुसरा मेट्रो रेल्वे पिंपरीत दाखल होणार आहे, असे मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सागितले.