वडगाव मावळात बनावट गुटखा तयार करणा-या कारखान्यावर छापा; ११ लाखांचा मुद्देमाल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2021 05:52 PM2021-09-06T17:52:47+5:302021-09-06T18:12:38+5:30
वडगाव मावळ हद्दीत बनावट गुटखा बनवून वितरण करत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती
वडगाव मावळ : बनावट गुटखा तयार करणा-या वडगाव येथील एका कारखान्यावर पोलिसांनी छापा मारून कच्चा माल यंत्रसामग्री, कार, असा एकूण ११ लाख ९८ हजार रूपयांचा मुद्दे माल जप्त केलाय. याप्रकरणी श्रीकांत बाळू चांदेकर (वय ३२ रा.ढोरे वाडा, वडगाव मावळ) याला अटक केली आहे.
पोलीस निरीक्षक विलास भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची निर्मिती, साठवण, विक्री व वाहतूक करण्यासाठी बंदी असताना, वडगाव मावळ हद्दीत बनावट गुटखा बनवून वितरण करत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. घटनास्थळी पोलिसांनी पाहणी केली असता, बनावट गुटखा बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल, यंत्र साधनसामग्री, चारचाकीसोबत श्रीकांत चांदेकर रंगेहाथ सापडला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. सोमवारी वडगाव मावळ न्यायालयात हजर केले असता, गुन्ह्याचा अधिक तपास करण्यासाठी न्यायाधीशांनी चांदेकरला गुरुवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय वडोदे करत आहेत.
मोठे रॅकेट उघडण्याची शक्यता
बनावट गुटखा प्रकरणी कामशेत, खालापूर येथे देखील गुन्हे दाखल आहेत. यामध्ये आणखी काहीजण सामील असून बनावट गुटख्याचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे. त्या दिशेने तपास असल्याचे पोलीस निरीक्षक विलास भोसले यांनी सांगितले.