पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा कळस म्हणजे जागतिक महिला दिनानिमित्तच्या निमंत्रणपत्रिकेत, तसेच कार्यक्रमांच्या फ्लेक्सवर राजमाता जिजाऊ यांचे छायाचित्र छापले नाही. त्यामुळे शहरातील महिला आणि संस्थांनी नाराजी व्यक्त केली.जागतिक महिला दिन देशभर मोठ्या उत्साहात साजरा झाला. महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागामार्फत जागतिक महिला दिनानिमित्त प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाच्या माहितीची स्मार्ट सखी या नावाने निमंत्रणपत्रिका छापली होती. तसेच शहराच्या मुख्य चौकात फलकदेखील लावले होते.या फलकावर सावित्रीबाई फुले, अहल्यादेवी होळकर, मदर तेरेसा, पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभा पाटील, ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ, कल्पना चावला, सानिया मिर्झा यांच्यासह विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या थोर महिलांचे छायचित्र छापले आहे. परंतु, राजमाता जिजाऊ यांचे छायाचित्र निमंत्रणपत्रिकेवर आणि फलकावर छापलेले नाही. महापालिकेच्या निमंत्रणपत्रिकेतही राजमाता जिजाऊ यांचे छायाचित्र प्रकाशित केले नव्हते. त्यामुळे महिलांनी नाराजी व्यक्त केली. महापालिकेच्या या भोंगळ कारभाराचा निषेध शहरातील विविध संस्थांकडून केला जात आहे. शिवसेनेने निषेध केला आहे.याबाबत शिवसेनेच्या महिला आघाडी प्रमुख सुलभा उबाळे म्हणाल्या, ‘‘महिला दिनाच्या कार्यक्रमाच्या निमंत्रणपत्रिकेवर आणि फलकावर राजमाता जिजाऊंचे छायाचित्र छापलेले नाही. शिवरायांच्या नावावर राजकारण करणाºया भाजपाला जिजाऊंचाविसर पडला आहे. थोरमहिलांच्या फोटोमध्ये राजमाता जिजाऊ यांचे छायाचित्र न छापून सत्ताधारी भाजपाला काय सुचवायचे आहे, याचा खुलासा महापौरांनी करावा अन्यथा पालिकेत येऊन आंदोलन केले जाईल. दिलगिरीव्यक्त करावी.’’शेतकरी कामगार पक्षातर्फे आंदोलनथेरगाव : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने महिला दिनानिमित्त ‘स्मार्ट सखी’ कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी छापलेल्या निमंत्रण पत्रिकेवर राष्ट्रमाता जिजाऊंचे छायाचित्र छापलेले नाही. त्याच्या निषेधार्थ शेतकरी कामगार पक्षातर्फे प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृह प्रवेशद्वार येथे निषेध आंदोलन करण्यात आले. महापौर नितीन काळजे तसेच सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी आंदोलकांची भेट घेऊन प्रशासनाकडून अशी चूक पुन्हा होणार नाही याची ग्वाही दिली व दिलगिरी व्यक्त केली. शेकापचे शहराध्यक्ष नितीन बनसोडे, कार्याध्यक्ष हरीश मोरे, अनिल वडघुले यांनी या वेळी मनोगत व्यक्त केले. उपाध्यक्ष नाना फुगे, शहर महिला अध्यक्ष छायावती देसले, सुरेखा मुळूक, उज्ज्वला लाड, सोनाली जाधव, सुभाष साळुंके, वैभव जाधव, दया करवीर, अविनाश रानवडे व शेकापचे कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.
राजमाता जिजाऊंचा पिंपरी-चिंचवड पालिकेला विसर, निमंत्रणपत्रिकेत छायाचित्र प्रसिद्ध न केल्याने नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 5:13 AM