तळेगाव दाभाडे : देशभरात नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि नागरिकत्व संशाेधन विधेयकाला (एनआरसी) विराेध हाेत असताना आज तळेगाव दाभाडे येथे या दाेन्ही कायद्यांच्या समर्थनार्थ माेर्चा काढण्यात आला. मावळ नागरिक एकता मंचच्यावतीने या माेर्चाचे आयाेजन करण्यात आले हाेते. या माेर्चाच्या माध्यमातून या कायद्यांना समर्थन देण्यात आले. तसेच हे कायदे कुठल्याही जातीच्या आणि धर्माच्या विराेधात नसल्याचे सांगण्यात आले.
सीएए आणि एनआरसी या दाेन्ही कायद्यांना देशभरात विराेध हाेत आहे. त्यामुळे या कायद्याच्या समर्थनार्थ देखील अनेक संघटनांकडून माेर्चे काढण्यात येत आहेत. आज तळेगाव दाभाडे येथे मावळ नागरिक एकता मंचच्यावतीने माेर्चा काढण्यात आला. मारूती मंदिर याठिकाणी सर्वजण जमल्यानंतर माेर्चाला सुरुवात झाली. यावेळी तिरंगा हाती घेवून तरुण अग्रभागी चालत होते. १५० फुटी तिरंगा असलेला मोठा ध्वज आणि हातात कायद्याच्या समर्थनार्थ बोर्ड घेवून नागरिक चालत होते. गाव भागातून मोर्चा पुन्हा मारुती मंदिर येथे आल्यानंतर छोटी सभा होऊन माेर्चाची सांगता झाली.
या माेर्चात राज्याचे माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे, भाजपचे पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे, नगराध्यक्ष चित्रा जगनाडे,मावळ तालुका भाजप अध्यक्ष रविंद्र भेगडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मावळ तालुका कार्यवाह हेमंत दाभाडे, बजरंग दलाचे कार्यकर्ते संदेश भेगडे, सुनील गावडे सर, यशवंत कदम,वारकरी संप्रदायाचे नंदकुमार भसे,सहयाद्री प्रतिष्ठानचे सदानंद पिलाने, शिवदुर्ग संस्थाचे सुनील गायकवाड,अवधूत धामणकर सहभागी झाले होते. चला देशासाठी उभे राहु सीएएला सपोर्ट करू, संविधानाचा विजय असो, भारत माता कि जय अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या. रॅलीमध्ये महिला आणि तरुणांचा सहभाग लक्षणीय होता.
'नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ मोठ्या संख्येने तळेगावकर एकजूट झाले होते. हा कायदा कुठल्या धर्माच्या किंवा जातीच्या विरोधी जाणार नाही'.काही राजकीय पक्ष आणि लोकांद्वारे या कायद्याबाबत समाजात गैरसमज पसरविण्यात येत असल्याचा आरोप देखील यशवंत कदम यांनी केला. अशा अफवा आणि गैरसमज पसरवणाऱ्यांच्या निषेधार्थ तळेगावकर रस्त्यावर उतरले असल्याचं त्यांनी बोलताना सांगितले. सर्व जातीच्या लोकांनी या कायद्याच्या समर्थनार्थ एकत्रित यावे असे त्यांनी सांगितले.
माेर्चाच्यावेळी माेठा पाेलीस बंदाेबस्त देखील तैनात करण्यात आला हाेता.