सीमाभिंतीच्या कामात रिंग, वाकडमधील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 03:35 AM2018-01-30T03:35:12+5:302018-01-30T03:35:19+5:30
महापालिकेतील स्थायी समितीने मंजूर केलेल्या ४२५ कोटींच्या रस्तेविकास कामांत रिंग झाल्याचे प्रकरण मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात गेले असताना शिवसेनेने आणखी एका प्रकरणात रिंग झाल्याचा आरोप केला आहे. वाकड येथील जकात नाक्याच्या जागेसाठी सीमाभिंत बांधण्याच्या कामात रिंग झाली आहे.
पिंपरी : महापालिकेतील स्थायी समितीने मंजूर केलेल्या ४२५ कोटींच्या रस्तेविकास कामांत रिंग झाल्याचे प्रकरण मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात गेले असताना शिवसेनेने आणखी एका प्रकरणात रिंग झाल्याचा आरोप केला आहे. वाकड येथील जकात नाक्याच्या जागेसाठी सीमाभिंत बांधण्याच्या कामात रिंग झाली आहे. पात्र निविदाधारकांना निविदा पाकीट उघडू नये, अशी धमकी सत्ताधाºयांकडून दिली जात आहे, असा गंभीर आरोप शिवसेनेच्या पदाधिकाºयांनी केला आहे. तसेच ठेकेदारांच्या पत्रांचा विचार न करता पात्र झालेल्या सर्व निविदा उघडण्यात याव्यात, अशी मागणीही केली आहे.
भाजपाची सत्ता आल्यानंतर वर्षभराच्या कालखंडात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. ४२५ कोटींच्या निविदा प्रकरणात रिंग झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेने केल्यानंतर भाजपाचे खासदार अमर साबळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी केली होती. त्यामुळे भाजपात स्वकीयांमध्येच आरोप प्रत्यारोप फैरी झडत आहेत. सावळे यांनी साबळेंची राजीनाम्याची मागणी केल्यानंतर साबळे समर्थकांनीही सावळेच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
भाजपाच्या दोन गटांतील वादाचे प्रकरण ताजे असतानाच वाकड येथील जकातनाक्याच्या जागेसाठी सीमाभिंत बांधण्याच्या कामात रिंग झाली आहे, असा आरोप शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी केला आहे. याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. वाकड येथील आरक्षण क्रमांक ४/११ येथील जकात नाक्याच्या जागेसाठी सीमाभिंत घालण्यात येणार आहे. त्या कामाची निविदा पालिकेने १५ ते ३० डिसेंबरला प्रसिद्ध केली. कालावधीत सहा जणांनी निविदा भरली. त्यापैकी पात्र निविदा धारकांची यादी महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली. त्यात पाच ठेकेदार पात्र ठरले होते. त्यापैकी दोघांनी निविदा पाकीट उघडू नये, अशी पत्रे दिली आहेत. परंतु, ही पत्रे राजकीय दबावातून दिल्याचा आरोप शिवसेना गटनेते कलाटे यांनी केला आहे.
महापालिकेचे आर्थिक नुकसान
राहुल कन्स्ट्रक्शन यांनी १८ जानेवारी व एस. एस. साठे यांनी २० जानेवारीला निविदा ही चुकीने बिड केली असून, ती उघडू नये तसेच आमची ईएमडी व पीएसडी परत मिळण्याची विनंती केली आहे. परंतु, या ठेकेदारांवर राजकीय दबाव आल्यामुळेच त्यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे या कामांमध्ये रिंग झाली आहे. पालिकेचे आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यासाठी ठेकेदारांच्या पत्रांचा विचार न करता पात्र झालेल्या सर्व निविदा उघडण्यात याव्यात, अशीही मागणी कलाटे यांनी केली आहे.
संबंधित प्रकरणावर निर्णय दिलेला नाही. याबाबत संबंधित विभागाकडूनही अभिप्राय मागविला आहे. बिल्डरची विनंती मान्य करणे बंधनकारक आहे का? याचा खुलासा करावा, मुख्य लेखापाल यांचे अभिप्राय घेऊन फेरसादर करावा, अशा सूचना दिल्या आहेत. यावर अंतिम निर्णय झालेला नाही. शिवसेना सदस्यांनी याबाबत काही आक्षेप नोंदविले असतील तर याबाबतचे निवेदन मला मिळालेले नाही. ते पाहून सदस्यांच्या आक्षेपांचाही विचार केला जाईल. - श्रावण हर्डीकर, आयुक्त