दाखल्यांसाठी शिधापत्रिकेचा ‘हट्ट’ सुरूच, शासनाच्या आदेशाला तलाठी कार्यालयाकडून केराची टोपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2017 06:10 AM2017-12-07T06:10:19+5:302017-12-07T06:10:30+5:30
विविध दाखल्यांसाठी शिधापत्रिका हा निवासाचा पुरावा म्हणून ग्राह्य धरू नये, या शासन आदेशाला तलाठी कार्यालयांकडूनच केराची टोपली दाखविली जात आहे
प्रज्ञा केळकर-सिंग/राजानंद मोरे
पुणे : विविध दाखल्यांसाठी शिधापत्रिका हा निवासाचा पुरावा म्हणून ग्राह्य धरू नये, या शासन आदेशाला तलाठी कार्यालयांकडूनच केराची टोपली दाखविली जात आहे. रहिवास, उत्पन्न अशा दाखल्यांसाठी या कार्यालयांकडून शिधापत्रिकेचा ‘हट्ट’ धरला जात असल्याचे ‘लोकमत पाहणी’त आढळून आले. त्यामुळे नागरिकांना ‘शिधा’ मिळणार नसला तरी नाईलाजास्तव शिधापत्रिका काढावी लागत आहे.
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून शिधापत्रिका ही संबंधित कुटुंबाला शिधावाटप किंवा रास्त भाव दुकानातून केवळ शिधावस्तू उचलण्यासाठी दिली जाते. त्यामुळे त्याचा वापर हा फक्त शिधावाटप दुकानातून वस्तू घेण्यासाठी करणे आवश्यक आहे.
अन्य कोणत्याही पुराव्यासाठी शिधापत्रिकेचा वापर करायचा नसतो. तशी सूचनाही प्रत्येक शिधापत्रिकेतवर छापण्यात आली आहे. तरीही अनेक कार्यालयांकडून निवासाचा पुरावा म्हणून शिधापत्रिकेचा आग्रह धरला जात आहे. उत्पन्न दाखला, रहिवास दाखला, कुटुंबप्रमुख दाखला तसेच विविध योजनांसाठी आवश्यक दाखले तलाठी कार्यालयातून दिले जातात. सध्या रहिवास दाखला तहसील कार्यालयातून दिला जात आहे. मात्र, इतर दाखल्यांसाठी शिधापत्रिका बंधनकारक असल्याचे या कार्यालयात सांगितले जात आहे. त्यामुळे नागरिकांना हेलपाटे मारावे लागत असल्याचे चित्र आहे.
तलाठी कार्यालय...
‘लोकमत प्रतिनिधी’ने दत्तवाडी येथील तलाठी कार्यालयात शिधापत्रिकेबाबत विचारणा केली. रहिवास दाखला या ठिकाणी मिळत नसल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. पण या दाखल्यासाठी शिधापत्रिका बंधनकारक असल्याचे तेथील महिला कर्मचारी म्हणाल्या. तसेच उत्पन्न व इतर दाखल्यासाठी निवासाचा पुरावा म्हणून शिधापत्रिकाच मुख्य पुरावा असल्याचे त्या ठामपणे सांगत होत्या.
प्रतिनिधी : रहिवास दाखल्यासाठी शिधापत्रिका नसेल तर चालेल का?
महिला : नाही, शिधापत्रिका बंधनकारक आहे.
प्रतिनिधी : निवासाचा पुरावा म्हणून शिधापत्रिका घेऊ नये, असे शासनाचे परिपत्रक आहे.
महिला : आमच्याकडे त्यांनी जे दिले आहे, त्यात शिधापत्रिका बंधनकारक आहे. उत्पन्नाच्या दाखल्यासाठीही घेतो.
प्रतिनिधी : मला शिधा मिळणार नसला तरी?
महिला : आता कुठे सगळ्यांना शिधा मिळतो. तरी पण शिधापत्रिका काढावीच लागते. सगळ्यात जुना निवासाचा पुरावा म्हणून शिधापत्रिकाच आहे. मतदार केंद्र, आधार कार्ड आत्ताचे आहे. दहा वर्षांच्या पुराव्यासाठी शिधापत्रिका आणि वीजबिल पाहिजे.
महा ई-सेवा केंद्र
महिला : रहिवासी दाखल्यासाठी काय करावे लागेल?
प्रतिनिधी : दाखला कशासाठी काढायचा आहे? कारण, रहिवासी दाखला कशासाठी काढायचा ते कारण अर्जामध्ये नमूद करावे लागते.
महिला : कागदपत्रे कोणकोणती लागतील?
प्रतिनिधी : रहिवासी दाखला काढायचा की डोमेसाईल? रहिवासी दाखल्यासाठी १५ वर्षांचे वीजबिल तर डोमेसाईल दाखल्यासाठी १० वर्षांचे वीजबिल लागते. इतर सर्व कागदपत्रे दोन्ही दाखल्यांसाठी सारखीच आहेत.
महिला : माझ्याकडे रेशनकार्ड नाही. मात्र, बाकीची कागदपत्रे आहेत.
प्रतिनिधी : इतर सगळी कागदपत्रे असतील
तर रेशनकार्ड नसेल
तरी चालेल.
उत्पन्नाच्या दाखल्यासाठी शिधापत्रिका पुरावा म्हणून ग्राह्य धरला जात नाही, असे शासनाचे आदेश आहेत. त्यासाठी उत्पन्नाचा स्रोत ग्राह्य मानला जातो. मात्र, रहिवासी दाखल्यासाठी शिधापत्रिका, पासपोर्ट, वीजबिल यापैकी कोणतेही एक कागदपत्र पुरावा म्हणून सादर
करता येते. - राजेंद्र मुठे,
निवासी उपजिल्हाधिकारी